नागपूर : स्टील कंपनीच्या व्यवस्थापकाच्या गळ्याला चाकू लावून चार लुटारूंनी सहा लाखांची रोकड लुटून नेली. आज दुपारी ३ ते ४ च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गिट्टीखदान, गोधनी मार्गावरील एस. एस. स्टील ट्रेडर्स कंपनी आहे. तेथे ईशान अर्जुन पोटभरे (वय २१) हा कलेक्शन मॅनेजर म्हणून कामाला आहे. कंपनीतर्फे ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांना पुरवण्यात आलेल्या मालाच्या (स्टील) रकमेची वसुली ईशान दर शनिवारी करतो. कंपनीचे संचालक सुरेंद्र दुबे यांचे कार्यालय यशोधरानगर जवळच्या मेहता पेट्रोल पंपाजवळ आहे. जमा केलेली रोकड दर शनिवारी मालकाच्या कार्यालयात तो जमा करतो. ईशानने आजही कळमेश्वर, फ्रेण्डस कॉलनी, जरीपटक्यातील वितरकांकडून सहा लाख रुपये गोळा केले आणि ही रोकड तो दुबे यांच्या कार्यालयात जमा करण्यासाठी मोटरसायकलने निघाला. दोन मोटरसायकलवर पाठलाग करीत आलेल्या चार लुटारूंनी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधी पुलावर त्याला रोखले. गळ्याला चाकू लावून लुटारुंनी ईशानजवळची रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली आणि पळून गेले. दिवसाढवळ्या वर्दळीच्या मार्गावर ही घटना अवघ्या काही सेकंदात घडली. लुटारु गेल्यानंतर ईशानने आरडाओरड केली. ही लुटमार बघणाऱ्या अनेकांनी ईशानसोबत लुटारुंचा पाठलाग सुरू केला. मात्र, लुटारु कामठीनाका, कळमन्याकडे पळून गेले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार, पोलीस उपायुक्त एस. एम. वाघमारे, यशोधरानगरचे पोलीस निरीक्षक साहेबराव जाधव, एपीआय दिलीप घुगे यांनी आपल्या ताफ्यासह आरोपींचा रात्रीपर्यंत शोध घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, लुटारुंचा सुगावा लागला नाही.(प्रतिनिधी)
यशोधरानगरात स्टील व्यापाऱ्याचे सहा लाख लुटले
By admin | Updated: July 13, 2014 01:01 IST