योगेश पांडे नागपूरराज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये एकाच विद्यापीठांतर्गत आणण्याचा राज्य शासनाचा विचार अद्यापही कागदांवरच प्रलंबित आहे. रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी अद्यापपर्यंत महाविद्यालये संलग्नित झालेली नाहीत. त्यामुळे सध्या तरी या विद्यापीठाची स्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. या विद्यापीठाला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार आवश्यक आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.महाराष्ट्रात नाशिक येथे संपूर्ण राज्यासाठी स्वतंत्र आरोग्य विद्यापीठ स्थापन झाले, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मत्स्य व पशुवैद्यकीय विद्यापीठ नागपूर येथे सुरू झाले. परंतु राज्यात ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालये असतानादेखील राज्यस्तरावर तंत्रशास्त्र विद्यापीठ नव्हते. त्यामुळे यासंदर्भात मागणी करण्यात येत होती. राज्यातील अभियांत्रिकी शिक्षण लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या नियोजित विद्यापीठासाठी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासोबतच पुणे, औरंगाबाद, मुंबई व नागपूर येथे विद्यापीठाची चार प्रमुख केंद्रे स्थापन करण्याचेदेखील ठरविण्यात आले होते. परंतु राज्यातील अनेक शिक्षणसम्राटांनी या निर्णयाला विरोध केला होता. मागील वर्षी राज्यातील महाविद्यालयांना या विद्यापीठाशी संलग्निकरण करण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु हा पर्याय ऐच्छिक होता व जवळपास सर्वच विद्यापीठांनी पारंपरिक विद्यापीठांशीच संलग्निकरण केले. जोपर्यंत महाविद्यालयांना या महाविद्यालयाशी संलग्निकरण करणे अनिवार्य करण्यात येत नाही, तोपर्यंत या विद्यापीठाचे महत्त्व वाढणारच नाही, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर दिली. यासाठी राज्य शासनाचा पुढाकार अपेक्षित असून, यासंबंधातील विधेयकात सुधारणा करणे आवश्यक आहे. याबाबत विनोद तावडे यांना विचारणा केली असता त्यांनी कुठलेही ठोस उत्तर दिले नाही. परंतु राज्य शासन याबाबत लवकरच निर्णय घेईल व सभागृहातील कार्यवाहीतून स्थिती स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थिती ‘जैसे थे’
By admin | Updated: December 9, 2015 03:24 IST