नागपूर :शेगाव पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग ४५० किमी लांबीचा असून या मार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर जालना व बीड जिल्ह्यातील पाच पुलांची प्रलंबित असलेली कामे एका महिन्यात सुरू करण्यास कंत्राटदारास सांगण्यात येईल. महिनाभरात काम सुरू न झाल्यास संबंधित कंत्राटदारवर दंडात्मक तसेच ब्लॅक लिस्ट करण्याची कारवाई केली जाईल, अशी घोषणा राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
आ. बबनराव लोणीकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडत शेगाव पंढरपूर मगामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, आजवर या रस्त्याबाबत कंत्राटदारांशी पन्नासहूून अधिक बैठका झाल्या आहेत. मंत्र्यांनी यापूर्वीही आदेश देऊन कामास सुरुवात झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. यावर उत्तर देताना देसाई म्हणाले, जोड रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने पुलांची कामे थांबली आहेत.
भूसंपादनाबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल. तथापि यासाठी पुलाचे काम थांबविणे योग्य नसून हे बंद असलेले काम एका महिन्यात सुरू करण्याबाबत संबंधित कंत्राटदारास सांगण्यात येईल. या प्रकरणी कोणी अधिकारी दोषी असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. तसेच या कामाच्या अनुषंगाने संबंधित लोकप्रतिनिधींसमवेत एका महिन्यात बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.