दंदे फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर : जिल्हाधिकारी कुर्वे यांचे आवाहन नागपूर : नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत जिल्हाधिकारी कुर्वे यांनी नव्या संकल्पाने नवीन वर्षाची सुरुवात करा, असे आवाहन केले. डॉ. दंदे फाऊंडेशन, मैत्री परिवार संस्था व डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रविनगर चौकातील डॉ. दंदे हॉस्पिटलसमोर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जनसंपर्क विभागाचे माहिती संचालक मोहन राठोड, डॉ. दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे, मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके व डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अशोक पत्की उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाजत गाजत नवीन वर्षाचे स्वागत करीत, जिल्हाधिकारी कुर्वे यांच्या हस्ते गुढी उभारून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, २००१ मध्ये नागपूर सोडले त्यावेळी शहरात अशाप्रकारचे फारसे कार्यक्रम होत नव्हते, परंतु आज हा कार्यक्रम पाहून हिंदू असल्याचा गर्व होत आहे. मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती दिली. शिवाय या कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी डॉ. हेडगेवार रक्तपेढीतर्फे पाहुण्यांच्या हस्ते प्रिया गायकवाड, अक्षय लोंढे व कामिनी नंदगवळी यांना अभिनंदन पत्र प्रदान करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते पक्ष्यांना उन्हाळ््यात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणीपात्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, डॉ. दंदे फाऊंडेशनचे विश्वस्त भास्कर लोंढे, दीपक वानखेडे, गंगाराम साखरकर, विष्णू मनोहर, अरविंद गिरी, मृणाल पाठक, मनीषा गर्गे, रश्मी देशकर, मिलिंद देशकर, सुरभी ढोमणे, सचिन ढोमणे, सुहास कोलते व जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माधुरी यावलकर यांनी केले.(प्रतिनिधी) ‘शिव संस्कृती’चा बँड मुख्य आकर्षण या संपूर्ण कार्यक्रमात ‘शिव संस्कृती’चे बँडपथक मुख्य आकर्षण ठरले होते. यात प्रसाद मांजरखेडे व त्यांच्या चमूने अप्रतिम बँडचे सादरीकरण केले. साधारण एक तास चाललेल्या बँडच्या या सादरीकरणाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. अशाप्रकारे ढोल-ताशांच्या गजरात आणि अतिशय उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.
नव्या संकल्पाने नव वर्षाची सुरुवात करा!
By admin | Updated: April 9, 2016 03:19 IST