कळमेश्वर : कळमेश्वर-लोणारा बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात याव्या, अशी मागणी वाहतूक नियंत्रक, बसस्थानक कळमेश्वर यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लॉकडाऊन काळापासून कळमेश्वर-लोणारा बसफेऱ्या पूर्णत: बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी सद्य:स्थितीत रात्री नऊ वाजताची हाल्टिंग बसफेरी सुरू करण्यात आली असून, उर्वरित बसफेऱ्या अद्यापही बंद असल्याने ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. विद्यालय, दवाखाना, आठवडी बाजार, किराणा, बँक, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, खरेदी-विक्री समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विविध कामानिमित्त नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. परंतु, बस फेऱ्या बंद असल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. निवेदन देताना अतुल नागपुरे, नीलेश नागपुरे, अभिषेक नागपुरे, राहुल महल्ले, रोहित नागपुरे, मंगेश डेहनकर, अविनाश डेहनकर, प्रवीण देवघरे, महेश देवघरे, राहुल भारसाकरे, जगन्नाथ डेहनकर, सलाम धनगरे, ज्ञानेश्वर लिखारे, तुषार ठाकरे, प्रफुल ठाकरे, विक्की डेहनकर, किशोर नागपुरे, दिनेश नागपुरे, जय नागपुरे, राहुल डेहनकर, उमाकांत डेहनकर, मनोज डेहनकर, आदी उपस्थित होते.