लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील हेल्थ झोन म्हणविणाऱ्या रामदासपेठ परिसरात एका हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. झाडीपट्टीतील प्रख्यात कलावंत सदानंद बोरकर यांच्याबाबतीत रामदासपेठेतील क्रीम कॉर्नर या रेस्टॉरेंटमध्ये अशी घटना घडली आहे. त्यांनी रेस्टॉरेंटमध्ये वाढलेले अन्न हे शिळे असल्याची तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी रेस्टॉरेंटच्या मालकालाही तक्रार केल्यानंतरही, त्यांच्याकडून थंड प्रतिक्रिया मिळाली आहे.शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सदानंद बोरकर हे त्यांच्या आईवडिलांना घेऊन रामदासपेठेतील एका रुग्णालयात नियमित तपासणीसाठी आले होते. तपासणीचा रिपोर्ट यायला उशीर असल्याने ते जेवण करायला शेजारीच असलेल्या क्रीम कॉर्नर रेस्टॉरेंटमध्ये गेले. त्यांनी साधं जेवण मागितले. जेवणाच्या थाळीत असलेली मटरची भाजी शिळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भाजीची चव आंबट असून वास येत असल्याने त्यांनी वेटरला सांगितले. दुसरी भाजी देतो म्हणून तो कामाला लागला. त्याच्या देहबोलीवरून भाजी खराब असल्याचे त्यालाही माहिती होते. कसेतरी दोन घास पोटात गेल्यावर बोरकर यांना मळमळ व्हायला लागली. ते सरळ मालकाकडे गेले आणि तक्रार केली. त्याने सरळ दुसºया भाजीचा पर्याय ठेवला परंतु कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर बोरकर यांनी बिल मागितले. वेटरने पूर्ण बिल आणून ठेवले. बिल चुकते करायला मालकाकडे गेल्यावर त्याने प्रत्येकाच्या थाळीतील एका भाजीचे चार्जेस कमी करून बिल घेतले. परंतु साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही.रामदासपेठ परिसरात शेकडो रुग्णालय आहे. बाहेरगावाहून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक येथे येतात. पर्याय नसल्याने हॉटेलमध्ये जेवण करतात. हे हॉटेलवाले नेहमीच असे शिळे अन्न खायला घालत असतील, याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरगावच्या लोकांना माहिती नसल्याने ते तक्रार करीत नाही. त्यामुळे हॉटेलमालकाची मनमानी वाढली आहे. हॉटेलमालक असे प्रकार करून आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप बोरकर यांनी केला आहे.यासंदर्भात क्रीम कॉर्नर या हॉटेलमध्ये संपर्क साधला असता, तेथील हिरालाल या व्यक्तीने सांगितले की, आमच्या हॉटेलमध्ये बोरकर जेवण करीत असताना, अनेक ग्राहक जेवण करीत होते, मात्र त्यांनी तक्रार केली नाही. असे असले तरी, बोरकर यांच्या तक्रारीमुळे आम्ही त्यांचे बिल कमी केले. माफीसुद्धा मागितली, असे असले तरी यापुढे आम्ही असा प्रकार होणार नाही, याची दक्षता घेऊ.
नागपुरातील रामदासपेठेच्या क्रीम कॉर्नरमध्ये मिळतेय शिळे अन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 19:01 IST
शहरातील हेल्थ झोन म्हणविणाऱ्या रामदासपेठ परिसरात एका हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. झाडीपट्टीतील प्रख्यात कलावंत सदानंद बोरकर यांच्याबाबतीत रामदासपेठेतील क्रीम कॉर्नर या रेस्टॉरेंटमध्ये अशी घटना घडली आहे. त्यांनी रेस्टॉरेंटमध्ये वाढलेले अन्न हे शिळे असल्याची तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी रेस्टॉरेंटच्या मालकालाही तक्रार केल्यानंतरही, त्यांच्याकडून थंड प्रतिक्रिया मिळाली आहे.
नागपुरातील रामदासपेठेच्या क्रीम कॉर्नरमध्ये मिळतेय शिळे अन्न
ठळक मुद्देग्राहकांची तक्रार : मालकाला सांगूनही प्रतिक्रिया थंड