लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाची विलोभनीय रूपे उलगडणारा, ऊन-पावसाच्या रोमांचक अनुभूतीचा व संपूर्ण सृष्टीवर हिरव्यागार पाचूंची मुक्त उधळण करणारा श्रावण हा सगळ्यांच्याच आवडीचा ऋतू. या शीतल वातावरणात प्रतिभावान कलाकारांच्या कलाविष्काराला विशेषच बहर येतो. शास्त्रीय, उपशास्त्रीय व हिंदी-मराठी रचनांसह ऋतुराज श्रावणाचे सुरेल स्वागत करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे करण्यात आले.‘श्रावणात घन निळा’ या शीर्षकासह सायंटिफिक सभागृह येथे सादर या कार्यक्रमाची संकल्पना शास्त्रीय गायक विनोद वखरे यांची तर संगीत संयोजन श्रीकांत पिसे यांचे होते. वखरे यांच्यासह अजय मलिक, मोनिका देशमुख, यशश्री भावे-पाठक हे सहभागी गायक होते. खास पावसाळ्यातच गायला जाणारा मल्हार रागाच्या विविध बंदिशी, उपशास्त्रीय गायन प्रकार, श्रावणाच्या मनभावन अनुभूतीची मराठी भावगीते, हिंदी सिनेगीते अशा भरगच्च व श्रवणीय अनुभूतीचा हा बहारदार कार्यक्रम होता. आर्त, तरल व स्वर्गीय अनुभूती देणाºया ‘श्रावणात घन निळा बरसला..., रिमझिम रेशीमधारा..., उलगडला झाडातून अवचित मोर पिसारा...’ अशा स्वरूपाची २३ गीते गायकांनी गोड सूरात व समरसतेने सादर केली. विनोद वखरे यांनी सर्वप्रिय राग मियाँ मल्हारच्या ‘सननन सनसन मेघा बरसे...’ बंदिशीसह राग मेघ मल्हार ‘उमड घुमड घन आये...’, राग गौड मल्हार मधील नाट्यगीत ‘नभ मेघांनी आक्रमिले...’ अशांसह ‘निले निले अंबर पे...’ आणि यशश्रीसोबत ‘अजहन आये बलमा...’ अशी सिनेगीते सुरेलतेने गाऊन आपल्या प्रतिभेचा परिचय दिला.मोनिकाने राग मेघ मल्हारमधील कजरी ‘सखी बैरन भई बरखा...’ यासह ‘श्रावणात घन निळा बरसला..., ऋतू हिरवा..., असा बेभान हा वारा...’ अशी वैविध्यपूर्ण गीते सादर केली. अजयने ‘रिमझिम गिरे सावन..., रिमझिम के गीत सावन गाएं..., भिगी भिगी रातो मे...’ अशी रोमांचक गीते मोनिका व यशश्रीसह सादर केली. यावेळी मोरेश्वर दहासहस्र, विशाल दहासहस्र, विक्रम जोशी, गोविंद गडीकर, अरविंद उपाध्ये, गौरव टांकसाळे व श्रीकांत पिसे या वाद्यकलावंतांनी साथसंगत केली. निवेदन स्मिता खनगई यांचे होते. यावेळी ज्येष्ठ गायक भाऊ भट लाडसे, शास्त्रीय नर्तक मदन पांडे, विनोद वखरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दमक्षेसां केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, कार्यक्रम अधिकारी दीपक कुळकर्णी, प्रेमस्वरूप तिवारी, गोपाल बेतावार, कुणाल गडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रावणात घन निळा बरसला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:59 IST
निसर्गाची विलोभनीय रूपे उलगडणारा, ऊन-पावसाच्या रोमांचक अनुभूतीचा व संपूर्ण सृष्टीवर हिरव्यागार पाचूंची मुक्त उधळण करणारा श्रावण हा सगळ्यांच्याच आवडीचा ऋतू. या शीतल वातावरणात प्रतिभावान कलाकारांच्या कलाविष्काराला विशेषच बहर येतो. शास्त्रीय, उपशास्त्रीय व हिंदी-मराठी रचनांसह ऋतुराज श्रावणाचे सुरेल स्वागत करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे करण्यात आले.
श्रावणात घन निळा बरसला...
ठळक मुद्देश्रावणगीतांनी रसिक चिंब : द.म. क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे आयोजन