नियंत्रण कक्षात नियमित फोन : पोलिसांची होत आहे गोची नागपूर : पोलिसांना दैनंदिन घडामोडींची माहिती देतानाच शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या नियंत्रण कक्षाला एका अफलातून समस्येने ग्रासले आहे. ही समस्या दिवसागणिक वाढतच असून, पोलिसांना त्याबाबत कारवाई करण्याचीही सोय नाही. अर्थात ज्यांच्याकडून पोलिसांना त्रास होत आहे, ते सर्व निरागस आहेत. अनेक चिमुकले नियंत्रण कक्षातील पोलिसांची रोज फिरकी घेत आहेत. ते ‘हे सर्व’ जाणीवपूर्वक नव्हे तर अनवधानाने करीत असल्याने पोलिसांची मोठी गोची झाली. शहरातील नागरिकांना कोणत्याही घटनेची पोलिसांना तात्काळ माहिती देता यावी म्हणून नियंत्रण कक्षाचा १०० क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. २४ तासात (दर दिवशी) नियंत्रण कक्षात हजारो कॉल्स येतात. त्यातील सुमारे तीन हजार कॉल्स अनावश्यक असतात. या तीन हजार कॉल्सपैकी अर्धेअधिक कॉल्स लहान मुले करतात. आई किंवा बाबांचा मोबाईल सहजपणे हातात घेऊन चिमुकले अनवधानाने बटन दाबतात. त्यातून १०० नंबर डायल झाल्यास नियंत्रण कक्षातील फोन खणखणतो. फोन उचलणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला फोन करणाऱ्याकडून कसलीही माहिती अथवा प्रतिसाद मिळत नाही. पोलीस नुसते हॅलो... हॅलो... करीत असतात. पलीकडून छोट्यांचा (चिमुकल्यांचा) आवाज ऐकू येतो. एकूणच हा फोन कुणी माहिती देण्यासाठी अथवा मदत मागण्यासाठी केला नाही तर फोनच्या बटन्स दाबता दाबता चिमुकल्यांच्या हातून अनवधानाने १०० नंबर डायल झाल्याचे लक्षात आल्याने पोलीस रिसिव्हर ठेवून देतात. दिवसा-रात्री अनेकदा असे अनेक कॉल्स पोलिसांना येत असतात.(प्रतिनिधी) व्यस्त असल्याची तक्रार एकाच वेळी एका नंबरवर वेगवेगळ्या ठिकाणाहून (नंबरवरून) फोन येत असेल तर तो नंबर व्यस्त असल्याची टोन फोन करणाऱ्यांना ऐकू येते. नियंत्रण कक्षाच्या बाबतीत हा प्रकार जवळपास रोजच आणि दिवसातून अनेकवेळा अनुभवाला मिळतो. १०० क्रमांकावर फोन केल्यास ‘अभी यह नंबर व्यस्त है...’, असे फोन करणाऱ्यांना ऐकू येते. अनेकदा फोन करूनही तसाच अनुभव येत असल्याने शेवटी फोन करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करतात. वरिष्ठांकडून नियंत्रण कक्षात याबाबत जाब विचारला जातो. पोलिसांचे नागरिकांना आवाहन लहानग्यांकडून विनाकारण फोन केले जात असल्याने केवळ पोलिसांनाच त्रास होत नाही तर ज्यांना एखाद्या गुन्ह्याविषयी महत्त्वाची माहिती द्यायची आहे किंवा तात्काळ मदत मिळवायची आहे, अशा पीडितांचीही १०० क्रमांक व्यस्त असल्यामुळे कुचंबणा होते. ते लक्षात घेता पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. पालकांनी आपले मोबाईल लहान मुलांच्या हातात पडणार नाही आणि त्या मोबाईलवरून १०० क्रमांकावर फोन लागणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एखाद्या मोबाईल नंबरवरून १०० नंबरवर वारंवार कॉल्स आल्यास संबंधित मोबाईलधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
चिमुकले घेताहेत पोलिसांची फिरकी
By admin | Updated: February 5, 2017 02:26 IST