लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : समाेर असलेल्या दुचाकीचालकास वाचविण्याच्या प्रयत्नात वेगात असलेली बाेलेराे उभ्या असलेल्या ट्रकवर मागून जाेरात धडकली. यात देवदर्शनाला जाणाऱ्या नऊ जणांपैकी तिघांचा घटनास्थळीच तर एकाचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. शिवाय, पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व जण हिवरा-हिवरी (ता. उमरेड) येथील रहिवासी, असून मित्र आहेत. ही घटना हिंगणघाट (जिल्हा वर्धा) शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज धान्य मार्केट यार्डसमाेर साेमवारी (दि. ४) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये मोहन राजेंद्र माेंढे (२२), सुरज जयवंत पाल (२०), आदेश हरिभाऊ कोल्हे (१७) व वाहनचालक शैलेश पंढरी गिरसावळे (२६) या चाैघांचा तर गंभीर जखमींमध्ये शुभम प्रमोद पाल (२२), समीर अरुण माेंढे (१७), भूषण राजेंद्र कोल्हे (२४), प्रणय दिवाकर कोल्हे (१७), चैतन्य प्रमोद कोल्हे (१२), सर्व रा. हिवरा-हिवरी, ता. उमरेड या पाच जणांचा समावेश आहे. देवदर्शनाला जायचे असल्याने त्यांनी एमएच-४०/केआर-६४८२ क्रमांकाच्या बोलेराेने साेमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हिवरा-हिवरी येथून प्रवासाला सुरुवात केली हाेती.
ही बाेलेराे हिंगणघाट शहरातील ‘ओव्हरब्रिज’वरून उतरत असताना समाेर असलेल्या दुचाकीचालकास वाचविण्याच्या प्रयत्नात शैलेशचा ताबा सुटला आणि वेगात असलेली बाेलेराे समाेर उभ्या असलेल्या एमएच-२९/टी-१००९ क्रमांकाच्या ट्रकवर मागून धडकली. यात बाेलेराेतील तिघांचा घटनास्थळीच तर एकाचा सेवाग्राम (जिल्हा वर्धा) येथील हाॅस्पिटलमध्ये उपचाराला नेताना वाटेतच मृत्यू झाला. जखमींपैकी दाेघांना सेवाग्राम येथील हाॅस्पिटलमध्ये तर दाेघांना नागपूर येथील हाॅस्पिटलमध्ये तसेच एकाला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे हिवरा-हिवरी येथे शाेककळा पसरली हाेती.
....
निर्माणाधीन उड्डाणपूल
राष्ट्रीय महामार्गावरून हिंगणघाट शहरात प्रवेश करणाऱ्या ‘ओव्हरब्रिज’वरून ही बाेलेराे जात हाेती. हा ‘ओव्हरब्रिज’ दुसऱ्या भागाला जिथे संपताे, त्या ठिकाणापासून अंदाजे १०० मीटर अंतरावर उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी दाेन्ही बाजूला वळणमार्ग तयार केले आहेत. हा ट्रक त्याच ठिकाणी उभा हाेता. उतारामुळे बाेलेराेच्या हेडलाईटचा प्रकाशझाेत खाली असल्याने चालकास समाेर उभा असलेला ट्रक व्यवस्थित दिसला नाही. मध्येच दुचाकीचालक आल्याने चालक गाेंधळला हाेता. ‘ओव्हरब्रिज’वरून उतरून वळण घेण्याच्या प्रयत्नात बाेलेराे ट्रकच्या मागच्या उजव्या भागावर धडकली.
....
बोलेराेचा चक्काचूर
धडक एवढी जबरदस्त हाेती ती त्यात बाेलेराेच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. शिवाय, दर्शनी भाग ट्रकमध्ये अडकला हाेता. बाेलेराला ट्रकमधून काढण्यासाठी ‘क्रेन’ची मदत घ्यावी लागली. मार्केट यार्ड असल्याने हा मार्ग वर्दळीचा आहे. बोलेराे काढण्यापासून तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी हिंगणघाट पाेलिसांना स्थानिक तरुण व राष्ट्रीय महामार्ग पाेलिसांनी मदत केली. याप्रकरणी हिंगणघाट पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.