नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा व महापालिका प्रशासन पुन्हा अलर्ट झाले आहे. लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती पुन्हा प्रशासनावर आली आहे. शाळा बंद कराव्या लागल्या आहे. येत्या दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार आहे. उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पालकमंत्री प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे. शहरात कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. पण प्रशासकीय यंत्रणेतच दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र लोकमतच्या पथकाच्या निदर्शनास आले. लोकमतच्या पथकाने शहरातील महत्त्वाच्या कार्यालयाचा आढावा घेतला असता, कोरोनाच्या संदर्भातील सुरक्षात्मक उपाययोजना नावाच्याच असल्याचे दिसून आले.
कोरोनाचे संक्रमण वाढत असले तरी, सरकारी कार्यालयातील गर्दी काही कमी झाली नाही. १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामे सुरू आहे. नागरिकही कामासाठी कार्यालयात गर्दी करीत आहे. सरकारी कार्यालयात कर्मचारी असोत की नागरिक सुरक्षेचे उपाय पाळले जात नसल्याचे दिसून आले. नागपूर महापालिका, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत क्रमांक २, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील पार्किंगमध्ये वाहने खचाखच भरलेली होती. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हताच, काहींनी लावलेला मास्क तोंडाखाली आला होता. अनेकजन तोंडाला रुमाल बांधलेले आढळले. कार्यालयाच्या बाहेर मास्क वापरा, शारीरिक अंतराचे पालन करा, असे फलक लावले होते. पण पालन होताना दिसत नव्हते. मनपाच्या शिक्षण विभागात एका अधिकाऱ्याने मास्क घातल्याशिवाय आत येऊ नये, असे फलक लिहिले होते. पण तो स्वत:च मास्क घालून नव्हता. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ग्रामीण भागात कोरोनाच्या निर्मूलनासाठी झटत असताना, आरोग्य विभागाचे कर्मचारी विनामास्क होते. सोशल डिस्टन्सिंगकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. सहा जिल्ह्यांची प्रशासकीय यंत्रणा ज्या कार्यालयातून हाताळली जाते, अशा विभागीय कार्यालयातही सुरक्षात्मक उपाययोजना नावाचीच होती. विविध दाखले देणारे तहसील कार्यालय, जिल्ह्याची अख्खी यंत्रणा सांभाळणारे जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाला होता.
- महापालिकेत कुणाचीही रोकठोक नाही
जागोजागी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणारी महापालिका कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात लोकांना सुरक्षात्मक उपाययोजनेचे पालन करावे, यासाठी एखादा सुरक्षारक्षक नियुक्त करीत नसल्याचे दिसून आले. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत अनेकजण तोंडावर मास्क न लावता येत होते. काहींचे तोंडावरील मास्क तोंडाखाली गेले होते. प्रशासकीय इमारतीच्या बाजूला हात धुण्यासाठी पाण्याची टाकी ठेवली होती, पण कुणी हात धुण्याची तसदी घेत नव्हते. सॅनिटायझर स्वत:च्या घरूनच आणावे असेच महापालिकेत चित्र होते. कुठेही सॅनिटायझरची सोय नव्हती. महापालिका इमारतीच्या वरांड्यात एक व्यक्ती थर्मल स्कॅनर घेऊन होता, पण तो कुणाचे तापमान मोजत नव्हता. कदाचित स्कॅनर बिघडले असावे. इमारतीच्या लिफ्टजवळ एक सुरक्षारक्षक तैनात होता. लिफ्टवर चार व्यक्ती फक्त असे स्पष्ट लिहिले असतानाही क्षमतेपेक्षा अधिक लोक आत शिरत होते, बाहेर येत होते. कुठलीही रोकठोक नाही. अधिकाऱ्यांच्या कक्षासमोरील काही कर्मचारी विनामास्क छान गप्पा ठोकत होते, चहाचे घेत होते. महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात काही कर्मचारी विनामास्क काम करीत होते. कुठे अभ्यागतांची चांगलीच गर्दी झाली होती. पण त्यांना हटकणारे, रांगेत या असे सांगणारे कुणीच नव्हते.
- जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ठरू शकतो कोरोना संक्रमणाचे केंद्र
जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्याला लागून असलेले तहसील कार्यालय आणि परिसर कोरोनाच्या संक्रमणाचे सर्वांत मोठे केंद्र ठरू शकते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या परिसरात कोरोनाची धास्तीबिस्ती आहे की नाही, असेच दिसून आले. वेगवेगळे दस्तावेज बनवून देणाऱ्या तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाला होता. रांगेत येऊन काम करून घेण्याची तसदी कुणी दाखवित नव्हते. परिसरात बसलेल्या टायपिस्टांच्या तोंडावर कुठे रुमाल, तर काहींचे मास्क तोंडाखाली गेले होते. काहींनी तर मास्कही काढून ठेवले होते. स्वत:च्या सुरक्षेकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. मुळात तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून मास्क न लावताही प्रवेश केल्यास कुणीही थांबवित नव्हते. तहसील कार्यालयातील अनेक कर्मचारीही विनामास्कने कामे करीत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करताच जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापुढे बसलेले अभ्यागत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसले नाही. विभागांच्या प्रवेशद्वारापुढे टेबल लावून अभ्यागतांना आत प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. पण कर्मचारी विनामास्क कार्यालयात कार्यरत होते. काहींचे मास्क तोंडाखालीही गेले होते. विवाह नोंदणी कक्षापुढे, तर लग्नाची वरात निघावी, असेच चित्र बघायला मिळाले.
- विभागीय आयुक्तालयात कसेही वावरा
सहा जिल्ह्यातील कोरोना संक्रमणावर मॉनिटरिंग करणारी यंत्रणा विभागीय कार्यालय आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या एका गेट समोर हात धुण्यासाठी नळ लावले आहे. पण तिथे हॅण्डवॉश अथवा साबणाची सोय नाही. तिथे आता कुणी हातही धूत नाही. विभागीय आयुक्तांच्या कार्यालयापुढे सॅनिटायझरची मशीन लावली होती. मात्र इतर तीन गेटवर ती सोय नाही. विभागीय आयुक्त कार्यालयातील वेगवेगळ्या विभागात काम करणारे काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना मास्क वगैरे वापरावे लागतात, याचे भान नसल्याचे दिसून आले. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाइनमध्ये अभ्यागतांची गर्दी होती. त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नव्हते. सुरक्षारक्षक विभागीय आयुक्त कार्यालयाला नाहीच. त्यामुळे अनेक जण मास्क न लावताच वावरताना दिसून आले.
- प्रशासकीय इमारतीत लिफ्टमध्ये जरा सांभाळून
प्रशासकीय इमारत क्रमांक २ मध्ये असणाऱ्या लिफ्टमध्ये कोरोनाची लागण होण्याची हमखास चिन्ह आहे. कारण लिफ्टमध्ये किती लोकांना प्रवेश द्यावा, याचे बंधन नाही. मास्क न लावताही अनेकजण ये-जा करताना येथे दिसून आले. आठ माळांच्या या इमारतीत मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालय आहे. शेकडो कर्मचाऱ्यांबरोबर, हजारो अभ्यागतांचा येथे नियमित वावर असतो. पण येथील कारभार सर्व अनियंत्रित आहे. येणाऱ्याला थर्मामीटरने तपासले जात नाही. सॅनिटायझरची सोय नाही. कुणाची रोकथांब नाही. कर्मचारीही बिनधास्त विनामास्क फिरतात. येथील अनेक कार्यालयांत कर्मचारी पॉझिटिव्हही निघालेत. तरीही कुठल्याही प्रकारची सुरक्षात्मक उपाययोजना नाही.
- जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर खबरदारी, आत बेसावधगिरी
जिल्हा परिषदेत खऱ्या अर्थाने सुरक्षात्मक उपाययोजना राबविल्या आहे. जिल्हा परिषदेतील सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. एकाच प्रवेशद्वारातून ये-जा केली जात आहे. प्रवेशद्वारापुढे दोन कर्मचारी सॅनिटायझर व थर्मल गन घेऊन तैनात केले आहे. काही विभागांत गर्दी होणार नाही, म्हणून काळजी घेतली जात आहे. कुठे दोऱ्या बांधल्या आहेत, तर कुठे टेबल लावून रस्ता अडविला आहे, पण तरीही काही महाभाग विनामास्क, शारीरिक अंतराचेही पालन करीत नाही. आरोग्य विभाग खऱ्या अर्थाने आदर्श ठरायला पाहिजे, पण येथे विनामास्क कर्मचारी काम करताना आढळले. समाजकल्याण, पंचायत विभागात एखादा सोडल्यास प्रत्येकाच्या तोंडावर मास्क होता, पण सवयीप्रमाणे तो तोंडाखाली गेला होता. शिक्षण विभागापुढे अभ्यागतांनी संख्या जास्त होती. त्यातील काहींनी मास्क जरा खाली केले होते. काहीजण बिनधास्तपणे कार्यालयात मास्क खाली करून फिरतानाही आढळले. जिल्हा परिषदेत आतापर्यंत ४०च्या जवळपास कर्मचारी अधिकारी पॉझिटिव्ह निघाले आहे. अभ्यागतांच्या वाढत्या संख्येमुळे कर्मचारी धास्तीत आहे.