मोहन भोयर - तुमसर चांदपूर जलाशयातून मागील अनेक महिन्यांपासून कासवांची तस्करी सुरु असल्याची धक्कादायक माहिती आहे. पोळ्याच्या दोन दिवसांपूर्वी व पाडव्याला तुमसर शहर व ग्रामीण अनेक कासव विक्रीला आले होते. कासवांची खेप परप्रांतात न गेल्याने स्थानिक परिसरात ती विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तलाव म्हणून चांदपूर तलावाची नोंद आहे. सुमारे ८९६ हेक्टरमध्ये तो पसरलेला आहे. या ब्रिटीशकालीन तलावात अनेक दुर्मिळ माशांसह कासव देखील मोठ्या प्रमाणात आहेत.काही महिन्यापासून या तलावातील कासव दर १०-१२ दिवसांनी पकडली जात आहेत. ती महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल राज्यात विक्रीकरिता पाठविली जातात. त्यामुळे कासव पकडणारी टोळी सक्रीय असल्याची दाट शक्यता येऊ लागली आहे. पोळ्याच्या दोन दिवसांपूर्वी तुमसर शहर व ग्रामीण भागात अनेक कासव विक्रीला आले होती. एका इसमाजवळ ६०-७० कासव विक्रीला होते. अर्धा ते एक किलोग्रॅम वजनाचे हे कासव ७० ते ८० रुपये प्रती किलो दराने विकण्यात आली. कासवांची ही खेप काही कारणास्तव परप्रांतात न गेल्याने स्थानिक भागात त्यांची विक्री करण्यात आली अशी माहिती आहे.उल्लेखनीय म्हणजे चांदपूर जलाशयाचे कंत्राट वर्षानुवर्षे एकाच मासेमारी संस्थेला दिले जात आहे. तलावाची देखरेख लघुपाटबंधारे विभागाकडे आहे. मुख्य अभियंत्यासह २२ ते २५ कर्मचारी येथे आहेत. ते काय करतात हा मुख्य प्रश्न आहे. मासेमारी संस्थेला येथे केवळ मासे पकडण्याचे कंत्राट मिळाला आहे. कासवे पकडण्याचा हा गोरखधंदा सुरु राजरोसपणे सुरू आहे.भारतात कासव संगोपन केंद्र आहेत. समुद्री कासव १० ते १५ किलोचा तर तलावातील कासव ५ ते ७ किलोचा असतो. कासवांच्या टणक पाठीला देश विदेशात मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पाठीला मागेल तितकी किंमत मिळते. कासव तस्करीत एखादी आंतरराज्यीय टोळी गुंतलेली असावी अशी शंका येऊ लागली आहे.
चांदपूर तलावातून कासवांची तस्करी!
By admin | Updated: August 31, 2014 01:09 IST