लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर नागपूरला पहिले स्थान प्राप्त झाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंत नागपूर शहरात प्रचंड वेगाने कामे सुरू आहेत. यामुळेच गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये नागपूर पहिल्या स्थानावर होते. सध्या दर शुक्रवारी साप्ताहिक आधारावर नवीन यादी जारी केली जाते.अनेक दिवसांपासून नागपूर दुसऱ्या क्रमांकावर होते. गुजरातमधील अहमदाबाद शहर पहिल्या क्रमांकावर चालत होते. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये नागपूरला पुन्हा एकदा पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे. केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या यादीमध्ये नागपूरला ३६७.४२ अंक मिळाले आहे. तर दुसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या अहमदाबादला ३६७.३६ अंक मिळाले आहे. ०.६ अंकाने नागपूर समोर आहे. ३४४.९९ अंकासह सुरत तिसऱ्या क्रमांकावर, ३३६.९ अंकासह भोपाळ चौथ्या क्रमांकावर तर ३११.६५ अंकासह राची पाचव्या क्रमांकावर आहे. त्रिपुरा सहावा, विशाखापट्टणम सातव्या, वडोदरा आठव्या, वेल्लोर नवव्या, अमरावती दहाव्या, पुणे अकराव्या, कानपूर बाराव्या नंबरवर आहे.स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात पुढे असलेले इंदोर शहर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत १५ व्या क्रमांकावर आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेले वाराणसी १४ व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड १९ व्या आणि नाशिक २३ व्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काढण्यात आलेल्या निविदा, मार्किंग, प्रकल्पांतर्गत रस्ते व गृहनिर्माण आदींसाठी नंबर दिले जातात. याच्याच आधारावर यादी तयार केली जाते.नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसएससीडीसीएल) च्या देखरेखीखाली शहरात प्रकल्पाचे काम सुरु आहे.सोशियो-इकोनॉमिक सर्वे सुरु आहेपूर्व नागपूरमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प अमलात आणला जात आहे. यात पारडी, पुनापूर, भरतवाडा आणि भांडेवाडीतील १७३० एकरचा विकास करण्यात येईल. संबंधित प्रकल्पासाठी सर्वेक्षण करून रस्ते व प्रभावित होणाऱ्या संपत्तींचे मार्किंग पूर्ण करण्यात आलेले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १२०० संपत्ती काही प्रमाणात तुटतील. तर ५०० संपत्ती पूर्णपणे तुटणार आहेत. संबंधित प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. सध्या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्यांचे अध्ययन करण्यासाठी सोशियो-इकोनॉमिक सर्वे केला जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू होईल.