मनपात ४२७२ पदे रिक्त : कशा मिळतील सुविधा ?गणेश हूड नागपूरउपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. स्मार्ट सिटीसाठी निवड होणाऱ्या शहरात उच्च दर्जाच्या मूलभूत सुविधा अभिप्रेत आहे. परंतु महापालिकेत विविध संवर्गातील ४२७२ पदे रिक्त आहेत. आधीच शहरातील रस्ते, कचरा व पथदिवे व पाणीपुरवठ्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सक्षम यंत्रणा नसल्याने सामान्यांच्या तक्रारींचे निराकरण होत नसल्याने प्रशासन हतबल आहे. त्यातच अपुऱ्या मनुष्यबळावर उच्च दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्याचा ‘स्मार्ट’ ओझ्याचा भार महापालिका कसा सोसणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, रस्ते यासह मुलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार झाला आहे. हुडकेश्वर-नरसाळा हा भाग महापालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. मेट्रोरेल्वे व मिहान प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे. या सोबतच शहराच्या लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. वाढत्या नागरिकरणामुळे मूलभूत सुविधांचा अतिरिक्त भार महापालिकेवर पडत आहे. याबाबीं गृहीत धरून शहर विकासाचा नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे. अपुरे मनुष्यबळ व नागरी सुविधांचा वाढता ताण विचारात घेता महापालिकेला रिक्तपदांच्या भरतीसोबतच नवीन पदे निर्माण करावी लागतील. परंतु महापालिकेचा सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता प्रशासनाला हा निर्णय घेणे शक्य नाही. पुढील दोन-तीन वर्षात महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त होणार असल्याने रिक्त पदांच्या संख्येत पुन्हा भर पडणार आहे. मोठ्या प्रमणात पदे रिक्त असल्याने मुख्यालयासोबत झोन कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. लहानसहान कामासाठी नागरिकांना झोन कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहे. रिक्त पदामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. आर्थिक स्थिती बिघडल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. पुढील एक-दोन वर्षातच सातवा वेतन आयोग लागू करावा लागणार आहे. त्यामुळे वेतनावरील खर्चात वाढ होईल. महापालिकेत विविध संवर्गात १२,५९७ पदे मंजूर आहेत. यातील ८,०७५ पदे कार्यरत असून ४,२७२ पदे रिक्त आहेत. स्मार्ट सिटीत स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. परंतु सफाई मजुरांची ३,८९० पदे मंजूर असताना ३,०८१ पदे कार्यरत असून ८०९ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे वर्ग-१ ची १९३ पदे मंजूर असून, यातील ९६ पदे रिक्त आहेत. वर्ग -२ ची ३२ पदे मंजूर असून, यातील २१ पदे रिक्त आहेत. वर्ग-३ च्या मंजूर ३,१३० पदांपैकी १,२४८ पदे रिक्त आहेत. वर्ग-४ च्या मंजूर २,७८५ पैकी १,५८४ पदे कार्यरत असून, १,२०१ पदे रिक्त आहेत. मानसेवी डॉक्टरांची ८५ पदे मंजूर असून यातील १८ पदे रिक्त आहेत.
अपुऱ्या मनुष्यबळावर ‘स्मार्ट ’ओझे !
By admin | Updated: December 14, 2015 03:24 IST