भंडारा अग्निकांड
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १० तान्हुल्यांच्या मृत्यूला जबाबदार असणारे अर्धा डझन दोषी पोलिसांच्या प्राथमिक तपासात अधोरेखित झाले आहेत. मात्र, पोलिसांवर प्रचंड दडपण असल्याने, याबाबतचा रेकॉर्ड तयार करावा की नाही, अशा द्विधा मनस्थितीत पोलिसांचे तपास पथक अडकले आहे. त्याचमुळे घटनेच्या तपासाला ९० तासांचा प्रदीर्घ कालावधी होऊनही १० तान्हुल्यांच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार, ते पोलिसांनी उघड केले नसल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. भंडारा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाने सर्वत्र संतापाचा आगडोंब उसळला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या दुर्घटनेला कोण जबाबदार आहेत, ते शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरिय समिती गठीत केली. तत्पूर्वीच भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनाने ‘आकस्मिक मृत्यूची नोंद करून’ एका डीवायएसपीच्या नेतृत्वात तीन अधिकारी आणि सुमारे १५ पोलीस अशी १९ जणांचे पथक या घटनेला कोण कारणीभूत आहेत, हे शोधण्यासाठी कामी लावले.
या तपास पथकाने घटनेच्या काही तासांपासूनच दोषींना शोधण्यासाठी रुग्णालयात घटनेच्या वेळी कोणकोण होते, त्यांची नावे मिळवून त्यातील अनेकांची बयाण नोंदविली. या बयानबाजीतून पोलिसांनी प्रथमदर्शनी तपासाचा ‘कच्चा अहवाल’ तयार केला. खास सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांच्या आजवरच्या तपासात घटनेच्या पूर्वी तेथे कुणाला कर्तव्यावर नेमण्यात आले होते, शिशु केअर युनिटच्या आत आणि बाहेर कुणाची ड्युटी होती, ते सर्वच्या सर्व पोलिसांच्या नजरेत आले आहे. त्यातूनच प्रथमदर्शनी सहा दोषींची नावे पोलिसांनी कच्च्या अहवालात तयार केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या चाैकशी समितीच्या प्रभावात पोलिसांचा तपास अडखळत, चाचपडत आहे. या संबंधाने तपासाची माहिती देण्यासही पोलीस कचरत आहेत. पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख डीवायएसपी काटे यांनी याबाबत काही सांगण्यास असमर्थता दर्शविली.
अनेकांचे जबाब नोंदविले - पोलीस अधीक्षक
चौकशी समितीकडून मिळालेल्या अहवालानंतर पोलीस आपले काम करतील. तूर्त पोलिसांच्या तपास पथकाने अनेकांचे जबाब नोंदविले आहे. किती जणांचे जबाब नोंदविले, त्यातून काय निष्कर्ष काढला, ते आता सांगता येणार नाही, अशी माहिती या संबंधाने भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.