नागपूर : देशात अवयवदान चळवळीला गती देण्यासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने आयोजित १५व्या भारतीय अवयव दान दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नॅशनल आॅर्गन अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट आॅर्गनायझेशनने (नोटो) मेडिकलला उत्कृष्ट ‘ब्रेनस्टेम डेथ डिक्लेरेशन कमिटी’ (बीएसडी) टीमचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात, मेडिकलचे ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर डॉ. सुमित चहाकर यांना 'नॅशनल लेव्हल बेस्ट ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर' म्हणूनही गौरवण्यात आले.
अवयवदान दिनाच्या पर्वावर २ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे झालेल्या ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’च्या समारंभात केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय सेलुकर आणि सर्जरी विभागाचे डॉ. आशुतोष जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. डॉ. सुमित चहाकर यांनी अवयवदान प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण समन्वय साधण्याचे काम केल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे अवयवदानाच्या क्षेत्रात नागपूरचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव निवेदिता शुक्ला-शर्मा, आरोग्य सेवा महांसचालक डॉ. सुनिता शर्मा, नोटोचे संचालक डॉ. अनिल कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण विदभार्साठी एक मोठा सन्मान या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी अवयवदान प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व संबंधित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाºयांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, हा पुरस्कार केवळ मेडिकलसाठीच नाही, तर संपूर्ण विदभार्साठी एक मोठा सन्मान आहे.