नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नागपूर शहरात सुरू केलेला धूलिवंदन महोत्सव कोरोना संक्रमणामुळे यावर्षी होणार नाही. त्याऐवजी नागरिकांनी घराच्या परिसरात स्वच्छता करून जमा झालेल्या कचऱ्याची होळी जाळावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
होळी-धूलिवंदन यातील अनिष्ट रूढींमुळे होणारी भांडणे थांबावी, या सणाचा खरा अर्थ व वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांना कळावा यासाठी ग्रामसफाई करून जमा झालेल्या कचऱ्याची होळी जाळून तुकडोजी महाराज धूलिवंदन महोत्सव घ्यायचे. प्रभातफेरी काढून शांतीचा संदेश द्यायचे. पुढे हा वारसा दुर्गादास रक्षक यांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळ विश्वकर्मा नगर शाखेतून चालवला. त्यांच्या पश्चात आता ज्ञानेश्वर रक्षक व मित्रपरिवार हा उपक्रम दरवर्षी राबवीत असतात. कोरोना संक्रमणामुळे यंदा हा सामूहिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या ऐेवजी नागरिकांनी आपल्या घरासभोवतालचा परिसर स्वच्छ करून केरकचऱ्याची होळी जाळावी. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन सामुदायिक ध्यान, प्रार्थना करावी, भजने म्हणावी, असे श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखेचे संयोजक ज्ञानेश्वर रक्षक यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.