लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजकल्याण विभागाच्या योजना राबविण्यात हलगर्जीपणा तसेच अखर्चित निधीची माहिती न दिल्याप्रकरणी नागपूर व हिंगणा पं.स.च्या बीडीओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी दिले. समितीच्या बैठकीत बीडीओंच्या अकार्यक्षमतेमुळे योजनांना फटका बसत असल्याची तक्रार समिती सदस्यांनी केल्याने हा निर्णय घेण्यात आला.अर्थसंकल्पात समाजकल्याण विभागासाठी २० टक्के निधी आरक्षित असतो. जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर हा निधी खर्च करण्यात येतो. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांकडून योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या नाही. याचा फटका योजनेला बसला. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले. वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे त्यांच्याकडून पालन करण्यात आले नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहिला. अखर्चित निधी विभागाकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु नागपूर ग्रामीण आणि हिंगणा पंचायत समितीकडून अखर्चित निधीही विभागाकडे परत करण्यास दिरंगाई केली. यामुळे हा निधी दुसऱ्या योजनांवरही वळता करता आला नाही. बुधवारी झालेल्या समाजकल्याण समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला. समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्ती केली. योजना राबविण्यास टाळाटाळ आणि अखर्चित निधी परत करण्यास दिरंगाई करणाऱ्या नागपूर ग्रामीण आणि हिंगणा पंचायत समितीच्या बीडीओं यांना कारणे दाखवा बजावण्याचे निर्देश गेडाम यांनी समाजकल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे यांना दिले. सर्वच घटकातील अपंगाना मिळणार लाभशासनाने दिव्यांगासाठी तीनवरून पाच टक्के निधीची तरतूद केली आहे. समाजकल्याणतर्फे अपंगांना लाभ देण्यात येतो. निधी वाढल्याने विभागाने सर्वच प्रवर्गातील दिव्यांगांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी चार नवीन योजना राबविण्यात येणार आहे. अंधांना सेन्सर स्टीक, कर्णबधिरांना कानाची मशीन, अस्थिव्यंगांना जयपूर फूटच्या धर्तीवर कृत्रिम अंगाचे वाटप व मतिमंद प्रवर्गासाठी शैक्षणिक कीट विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी स्प्रे पंप आणि कांडप मशीनही देण्याची योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सभापती दीपक गेडाम यांनी दिली.
नागपूर आणि हिंगणाच्या बीडीओंना कारणे दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:59 IST
समाजकल्याण विभागाच्या योजना राबविण्यात हलगर्जीपणा तसेच अखर्चित निधीची माहिती न दिल्याप्रकरणी नागपूर व हिंगणा पं.स.च्या बीडीओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी दिले. समितीच्या बैठकीत बीडीओंच्या अकार्यक्षमतेमुळे योजनांना फटका बसत असल्याची तक्रार समिती सदस्यांनी केल्याने हा निर्णय घेण्यात आला.
नागपूर आणि हिंगणाच्या बीडीओंना कारणे दाखवा
ठळक मुद्देसमाजकल्याण सभापतींचे निर्देश : अखर्चित निधी परत करण्यात दिरंगाई