नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेनेच्या उमेदवारासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे हे स्वत: अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यामुळे कुणाचे काम करावे याबाबत संभ्रम वाढला होता. अशा परिस्थितीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख किंवा सहसंपर्कप्रमुख यांनी आपल्याला कुठलेही मार्गदर्शन केले नाही. सोबतच शिवसेनेच्या उमेदवाराने आपल्याशी कधीही संपर्क साधला नाही, असा खुलासा शिवसेनेच्या नगरसेविका शीतल घरत व मंगला गवरे यांनी केला आहे.विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी बंडखोरी करीत दक्षिण नागपूरच्या रिंगणात उतरलेले माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांच्या प्रचारात शिवसेनेच्या नगरसेविका शीतल घरत व मंगला गवरे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. याची दखल घेत सहसंपर्क प्रमुख चंद्रहास राऊत यांनी या दोन्ही नगरसेविकांना शिस्तभंगाच्या कारवाईबाबत नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. यानुसार घरत व गवरे यांनी आपले स्पष्टीकरण राऊत यांच्याकडे सादर करीत पक्षाच्या नेत्यांवरच नेम साधला आहे. घरत व गवरे यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे की, आम्ही महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आलो आहोत, याची जाणीव आहे. मात्र, निवडणूक काळात आम्ही तीन-चार दिवस सतत शिवसेनेता गेले असता कार्यालयाला कुलूप लागले होते. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सेनेची युती होती. त्यावेळी सुधाकर कोहळे यांनी आम्हाला मदत केली होती. त्यामुळे त्यांचा मदतीचा आग्रह होता. जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांचाही तसाच आग्रह होता. अशा परिस्थिती शिवसेना उमेदवाराने आमच्याशी संपर्क साधला नाही व पक्षातील नेत्यांनीही मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे आपण नोटीस मागे घेऊन आम्हाला मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
शिवसेना नेत्यांनी मार्गदर्शन केले नाही
By admin | Updated: November 1, 2014 02:49 IST