सज्जन पाटील
लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : शिंगाड्यांची राेपं (वेली) मार्चमध्ये लावणीयाेग्य हाेत झाल्याने कुही तालुक्यातील ढिवर समाजबांधवांनी शिंगाड्यांच्या वेलींची लागवड करायला सुरुवात केली आहे. प्रशासनाने शासकीय तलाव शिंगाडा लागवडीसाठी लीजवर देणे बंद केल्याने ढिवर समाजबांधव खासगी तलाव किरायाने घेऊन शिंगाड्यांचे उत्पादन घेतात. हा किराया शासकीय लीजच्या तुलनेत कितीतरी अधिक असल्याने शिंगाड्यांच्या उत्पादनखर्चात वाढ हाेत असून, तुलनेत भाव कमी मिळत असल्याने शिंगाडा उत्पादकांना नुकसान सहन करावे लागते. शिवाय, शिंगाडा शेतीला शासनाचे संरक्षणही नाही.
कुही तालुक्यातील कुही, मांढळ, वग, वेलतूर, रेंगातूर, तारणा, पचखेडी तसेच शेजारच्या उमरेड व भिवापूर तालुक्यातील काही गावांध्ये आणि भंडारा, चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यातील काही भागात दरवर्षी शिंगाड्याची शेती केली जात असून, उत्पादन घेतले जाते. ढिवर समाजबांधवांची ही परंपरागत शेती असून, त्यांच्या उत्पन्नाचे एक प्रभावी साधनही आहे. या भागात माेठे तलाव, मालगुजारी तलाव, गावतलाव, छाेटे तलावांची (बाेडी) संख्या अधिक असल्याने त्यांना पूर्वी शिंगाडा उत्पादनासाठी हे तलाव सहज लीजवर उपलब्ध व्हायचे. मागील काही वर्षापासून प्रशासनाने शिंगाडा उत्पादनासाठी त्यांना शासकीय तलाव लीजवर देणे बंद केले आहे.
परिणामी, त्यांना खासगी तलाव व गावतलाव किरायाने घेऊन शिंगाड्यांचे उत्पादन घ्यावे लागत आहे. या तलावांचा किराया त्यांच्या आकारावर अवलंबून असताे. तलावाच्या किरायापाेटी त्यांना किमान २० हजार ते कमाल १० लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागताे. हा किराया वर्षभराचा असताे. शासकीय तलावांच्या लीजसाठी त्यांना एवढ्या माेठ्या प्रमाणात खर्च करावा लागत नसे. शिंगाडा शेतीला शासकीय संरक्षण नसल्याने नुकसान झाल्यास शासनाकडून काेणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. शिवाय, ढिवर समाजबांधवांना लागवडीसाठी बँकांकडून कर्जपुरवठाही केला जात नाही. शिंगाडा उत्पादनात खर्च अधिक हाेत असून, उत्पन्न कमी मिळत असल्याने ताेटा सहन करावा लागताे, अशी माहिती मांढळ (ता. कुही) येथील लक्ष्मण डहारे या शिंगाडा उत्पादकाने दिली.
...
खर्च अधिक, उत्पन्न कमी
तलावांच्या किरायामुळे शिंगाड्यांच्या उत्पादनखर्चात माेठी वाढ झाली आहे. साेबतच किडींपासून रक्षण करण्यासाठी शिंगाड्यांच्या वेलींवर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. साेबतच चांगल्या उत्पादनासाठी रासायनिक खतेही द्यावी लागतात. त्यामुळे राेप व या निविष्ठांवरील खर्चही वाढला. २० हजार रुपयांमध्ये किरायाने घेतलेल्या तलावामध्ये शिंगाड्यांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी आणखी ५० हजार रुपये खर्च करावे लागतात. या तलावामध्ये उत्पादन हाेणाऱ्या शिंगाड्यांपासून ६० ते ६५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती ढिवर समाजबांधवांनी दिली.
...
काेराेना संक्रमणाचा जबर फटका
मागील वर्षी शिंगाड्यांचे चांगले उत्पादन झाले हाेते. मात्र, काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. याच काळात अर्थात ऑगस्टमध्ये शिंगाडे बाजारात आले. या काळात वाहतूक व विक्री व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली हाेती. त्यामुळे शिंगाडे माेठ्या प्रमाणात बाजारात पाेहाेचू शकली नाही. त्यामुळे उत्पादकांना जबर फटका बसला. शिंगाड्यांपासून वेगवेगळी पदार्थ तयार केली जात असली तरी त्याचा उत्पादकांना फारसा आर्थिक लाभ मिळत नाही.
...
राेपे तयार करण्याची पद्धती
वेलींवर पक्व झालेले शिंगाडे गळून पाण्यात पडतात आणि त्या शिंगाड्यांपासून पुन्हा वेली तयार हाेतात. फेब्रुवारी, मार्चमध्ये या वेली पाण्यावर येत असल्याने त्या लागवडीयाेग्य हाेतात. त्यामुळे ढिवर समाजबांधव या वेली काळजीपूर्वक उपटतात आणि त्यांची हव्या त्या ठिकाणी लागवड करतात. अलीकडच्या काळात ही राेपे विकली जात असल्याने नवा व्यवसाय सुरू झाला असून, राेपे विकत घेतल्याने शिंगाड्यांच्या उत्पादनखर्चात वाढ झाली आहे.