लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशात क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. तरुणांमध्ये पॅशन आहे. क्रिकेटमध्ये करीअर करणे कोट्यावधी तरुणांचे स्वप्न असते. परंतु एका तरुणीने मात्र क्रिकेटच्या वेडापायी चांगली बॅंक मॅनेजरची नोकरी सोडली आणि किक्रेट मॅच रेफरी बनण्याला प्राधान्य दिले. क्रिकेटसाठी वेड्या असलेल्या या तरुणीचे नाव आहे नमा खोब्रागडे.
बीसीसीआयसाठी १७ ते १९ जून दरम्यान अहमदाबाद येथे झालेल्या क्रिकेट मॅच रेफरीच्या परीक्षेत विदर्भ क्रिकेट असोसिएशनची नमा खोब्रागडे यशस्वी झाली असून ती टॉप तीन मध्ये आली आहे. ऑल इंडिया स्तरावर ७५ उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी १० उमेदवारांची मॅच रेफरी म्हणून निवड झाली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या दोन मुलीं सोनिया दुसऱ्या व नमा हिची तिसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे.
नमा खोब्रागडे हिला लहानपणीच क्रिकेटची आवड आहे. टीव्ही वर क्रिकेट मॅच बघता बघता आवड निर्माण झाली. गल्लीत क्रिकेट खेळू लागली. विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि वेस्ट झोन ला ज्युनिअर व सिनियर लेव्हल ला रिप्रेझेंट केले. याशिवाय विद्यापीठ स्तरावर ती नागपूर विद्यापीठाची कॅप्टन होती. नमा खोब्रागडे यांनी २०१७ मध्ये क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. बँक मध्ये पी ओ या पदावर तिची नियुक्ती झाली. सिनियर मॅनेजर या पदावर ती कार्यरत होती. या मोठ्या पगाराच्या नोकरीचा २०२४ मध्ये राजीनामा दिला आणि मॅच रेफरी च्या परीक्षेची तयारी केली. या परीक्षेचा निकाल ३ जुलैला जाहीर झाला. त्यात यश मिळवून नमा खोब्रागडे, बिसीसीआय च्या क्रिकेट मॅच रेफरी साठी निवड झाली. नमा खोब्रागडे यांचे क्रिकेट चे पॅशन एवढे प्रचंड होते की त्यांनी बँक ऑफ बडोदाचे सिनियर मॅनेजरचे पद सोडून दिले. क्रिकेटच्या पॅशन पोटी कुटुंबियांनी सुद्धा तिला साथ दिली. नमाची मोठी बहीण नेहा व क्रांती तसेच जीवन बच्छाव यांनी प्रोत्साहित केले.नमा खोब्रागडे ही माजी सनदी अधिकारी इ .झेड .खोब्रागडे व सामाजिक कार्यकर्त्या, संविधान फाउंडेशन च्या रेखा खोब्रागडे यांची मुलगी आहे.