नागपूर : मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प आणि आनंदाची देवाणघेवाण केली जात असताना या सणाच्या नावाखाली आज दिवसभर सुरू असलेल्या पतंगबाजीच्या उन्मादाने कान, नाक, ओठ, मान, हात तर कुणाचा पाय कापला. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयात १५० जखमींवर उपचार करण्याची वेळ आली. आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही गुरुवारी दिवसभर हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालत होते. यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी संतप्त भावना या घटनेतून पोळलेल्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
पतंगबाजांचा हा उन्माद आणि मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. नायलॉन मांजाच्या धोका हा केवळ एका शहरापुरताच मर्यादित नसून राज्यातील अनेक शहरांतील नागरिकांच्या जीवावर यामुळे बेतू शकते. लोकप्रतिनिधी व प्रशासनासोबतच सरकारने स्वत:हून यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसून येत नाही. लोकप्रतिनिधी हे चारचाकीशिवाय प्रवासच करीत नसल्याने त्यांना या धोक्याची कल्पनादेखील येत नाही. एरवी लहानसहान प्रकरणांत मोठी आंदोलने करणाऱ्या नेत्यांना रस्त्यांवरील हा मृत्यूचा धोका दिसत नाही का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
-दुचाकीस्वारांनी जीव मुठीत घेऊन वाहने चालविली
शहरातील निरनिराळ्या भागात दुचाकीस्वार अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहने चालवीत होते. मेडिकलमध्ये मांजामुळे जखमी झालेल्यांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा गळा कापला. परंतु गंभीर जखम नसल्याने थोडक्यात वाचले. मांजामुळे दोन परिचारिकांचा अपघात होऊन त्यांना किरकोळ जखमा झाल्या. दोन पुरुषांचे मांजामुळे नाक कापले. मेडिकलच्या प्लॅस्टिक विभागावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. पायी घरी जात असलेल्या महिलेचा गाल मांजाने चिरला. सात ते आठ टाके लागले. मेयोमध्येही असेच रुग्ण दिसून आले. पंतगीच्या नादात एक मुलगा पहिल्या मजल्यावरून खाली पडला. मेडिकलच्या ट्रॉमा केअर विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
-मांजामुळे या भागात सर्वाधिक फटका
महाल, इतवारी, मानेवाडा, गोपालनगर, चुनाभट्टी, जरीपटका, रेशीमबाग, मेडिकल मार्ग, सक्करदरा, गांधीबाग, पाचपावली, इंदोरा, जरीपटका या भागांमध्ये अनेक नागरिकांना मांजाचा फटका बसला. काही नागरिक तर गळ्याभोवती रुमाल, स्कार्फ किंवा मफलर गुंडाळून दुचाकी चालवित होते. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगबाजीच्या नावावर जो उन्माद उपराजधानीत सुरू होता तो चीड आणणारा आहे. या पतंगबाजीमुळे ज्यांचा बळी गेला किंवा जे जखमी झाले, त्यांचे झालेले नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही, असे मत अनेकांनी ‘लोकमत’कडे नोंदविले.
-‘डीजे’चा धांगडधिंगा
घराच्या छतांवर ‘डीजे’ किंवा ‘म्युझिक सिस्टिम’ लावून अक्षरश: कानठळ्या वाजवणाऱ्या आवाजात गाणी लावली होती. यामुळे परिसरातील वृद्ध नागरिक, विद्यार्थी, रुग्ण यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. याशिवाय घोळक्याने धांगडधिंगा करीत काहींनी मुलींची छेडखानी करणे, घाणेरड्या कमेन्टस् करणे, आरोळ्या ठोकणे असे प्रकारदेखील झाले. यासंदर्भातदेखील पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसून आली नाही.