शोभायात्रेत ‘जय हनुमान’ ने दुमदुमले शहर : हनुमान मंदिरात विविध धार्मिक अनुष्ठाने नागपूर : राजाबाक्षा हनुमान मंदिराच्या शोभायात्रेची परंपरा ऐतिहासिक आहे. यावर्षीही परंपरेनुसार शोभायात्रेचे भव्य आयोजन मंदिर समितीतर्फे करण्यात आले. ‘शरण शरण हनुमंता, तुज आलो रामदुता’ म्हणत लाखो भक्त ऐतिहासिक शोभायात्रेचे साक्षी ठरले. शोभायात्रेच्या मार्गावर जय श्री हनुमान व रामनामाचा गजर होता व भक्तांच्या चेहऱ्यावर हनुमंताच्या भक्तीचा भाव होता. चौकाचौकात डिजेवर लावलेले ‘दुनिया चले ना श्रीराम के बिना, रामजी चले ना हनुमान के बिना..., रामजी की निकली सवारी..., जय जय जय बजरंगबली...’ अशा भक्तिमय गीतांनी भक्तीचे वातावरण जागवले.ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी लागलेले स्वागतद्वार, प्रसाद वितरण आणि भक्त ांच्या गर्दीने वातावरण भक्तिमय झाले. जय हनुमानचा जयघोषात भक्तांच्या आनंद उत्साहाला भरते आले होते. अशा आनंदमय उत्साहाच्या वातावरणात दक्षिण नागपूरचा परिसर श्रीरामभक्त हनुमंताच्या भक्तीने दुमदुमला होता. यावर्षीचे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती लक्षात घेता मंदिर समितीतर्फे कुठलाही बँड व तत्सम वाद्ययंत्र शोभायात्रेत ठेवण्यात आले नव्हते.राजे मुधोजी भोसले, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, देवेंद्र दस्तुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्तीची पूजा अर्चना करून मंदिराचे आचार्य विवेक तिवारी यांनी मूर्ती रथावर विराजमान केल्या. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. विविध सामाजिक संघटना, आर्थिक प्रतिष्ठान आणि राजकीय नेत्यांनी समाविष्ट केलेले ५० चित्ररथ शोभायात्रेत ठेवण्यात आले. यामध्ये रामायणातील प्रसंगांचे चित्ररथ विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. श्रीराम-जानकी विवाहप्रसंग, रामसीता दर्शन, सीताहरण प्रसंग, श्रीरामाचे अश्वमेध यज्ञ प्रसंग, पंचमुखी हनुमान मंदिर आदी चित्ररथांसह परशुराम भीष्म युद्ध, अहिल्या उद्धार प्रसंग, खलताडका वध प्रसंग, वराहद्वारा हिरण्यकक्षपु वधप्रसंग, साई दर्शन, तिरुपती बालाजी दर्शन, राधाकृष्ण दर्शन, विठ्ठल-रखुमाई दर्शन, गणेश दर्शन, मातृ शक्ती दर्शन, गजानन महाराज, शिव दर्शन, रेणुका दर्शन आदी चित्ररथांसह ५० चित्ररथ शोभायात्रेत होते. मेडिकल चौक, उंटखाना, हनुमाननगर, रेशीमबाग, हेडगेवार स्मृती भवन, झेंडाचौक, नंदनवन, सक्करदरा चौक,अयोध्यानगर, तुकडोजी चौक, मानेवाडा या मार्गाने होत टीबी वॉर्ड चौक व परत राजाबक्षा मंदिरात शोभाया९ेचे समापन करण्यात आले. जवळपास एक ते दीड लाख भाविक या शोभायात्रेत सहभागी झाले.(प्रतिनिधी)कुठे महाप्रसाद तर कुठे पाणी वितरणशोभायात्रेत सहभागी झालेले आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रत्येकजण सरसावला होता. हनुमान जयंतीनिमित्त जागोजागी महाप्रसाद तसेच पाणी वितरण करण्यात आले. कुठे बुंदी, कुठे पुरी-भाजी, चणामसाला, मसालाभात, तर कुठे मठ्ठा आणि ताक वितरीत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी गर्दी करणारे महिला, पुरुष, तरुण, वृद्धांनी या महाप्रसादाचा आनंद घेतला.प्रत्यक्ष हनुमंतासोबत सेल्फीडिजिटल युगात सेल्फीचा प्रकार अतिशय प्रचलित आहे. हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत एक भक्त प्रत्यक्ष श्री हनुमानाच्या रूपात सहभागी झाला होता. हा सजीव हनुमान प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र ठरला होता. त्यामुळे या सजीव हनुमंतासोबत सेल्फी घेण्याचा मोह कुणालाही आवरत नव्हता. प्रत्येकजण हनुमंतासोबत सेल्फी काढून घेण्यासाठी पुढे सरसावताना दिसत होता. बिनशिरा डुंडा हनुमान मंदिरमानेवाडा चौकातून अवघ्या दहा किलोमीटरवर वरोडा गावात प्रसिद्ध बिनशिरा डुंडा मारोतीचे मंदिर आहे. जवळच्याच नाल्यात ही मूर्ती परिसरातील एका व्यक्तीला सापडली. मूर्तीला शीर आणि हात नव्हते. त्या व्यक्तीने एका चबुतऱ्यावर मूर्तीची स्थापना केली. हळुहळु बिनशिरा डुंडा मारोतीवर भाविकांची श्रद्धा वाढू लागली. आज वरोडा गावात भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. संपत रामाजी खडसे व डोमा घुलबा आडे यांनी मंदिरासाठी जागा दान दिली आहे. हनुमान जयंतीला मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. दरवर्षी ऋषिपंचमीला येथे मोठ्या धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हनुमान जयंतीला विश्वनाथ आसेगावकर महाराजांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर रक्तदान शिबिर व व्यसनमुक्ती शिबिरसुद्धा घेण्यात आले. सध्या मंदिराचे व्यवस्थापन शिवचरणसिंह हिरासिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेत सुरू आहे. कमिटीचे सचिव कृष्णराव चिंधबाजी सातपुते, सदस्य सुनील देशमुख, रामकृष्णा खडसे, रमेश चंभारे, शामराव कुकडे आहेत. हनुमान मंदिर, खामलाखामल्यातील नवनिर्मित हनुमान-शनी मंदिरात हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. रामनवमीपासून या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. गुरुवारी रात्री मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला आमदार मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे, नगरसेवक गिरीश देशमुख, नगरसेवक प्रकाश तोतवाणी, जय हरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यानंतर सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत श्रोते उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दुपारपासून भव्य महाप्रसादाला सुरुवात झाली. हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी ३ च्या सुमारास भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय जोशी यांनी मंदिरात दर्शन घेतले. मंदिर समितीचे प्रमुख पंजू तोतवाणी यांनी यावेळी जोशी यांचे स्वागत करून त्यांना मंदिराची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे प्रशांत पवार, भाजयुमोचे सुरेंद्र यादव, अमित पांडेसह अनेक कार्यकर्ते होते. भोसल्यांच्या शेतातील जागृत रमणा मारुतीशहरातील प्रख्यात हनुमान मंदिरांमध्ये रमणा मारुती हनुमान मंदिराचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात येतो. या मंदिरालाही भोसले काळाची परंपरा आहे. भोसले राजाचे नातेवाईक कोल्हापूरचे गाडगे यांच्या वाट्याला हे शेत आले होते. या शेतातच हनुमानाची मूर्ती मिळाल्याचे सांगण्यात येते. पुढे भक्तांनी छोटेसे मंदिर निर्माण केले आणि आज या देवस्थानाला भव्य रूप प्राप्त झाले आहे. पडित असलेल्या या शेतात गुरेढोरे चरायची. त्यामुळे या परिसराला रमणा असे म्हटल्या जात होते व या शेतात हनुमंताची मूर्ती मिळाल्याने रमणा मारुती असे नाव पडले. पुढे देवस्थानाच्या नावावरच परिसराचेही नाव रमणा मारुतीनगर असे पडले. दरवर्षी हनुमान जयंतीच्यावेळी परिसराला यात्रेचे रूप प्राप्त होते. याहीवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. १५ एप्रिल रोजी रामनवमीच्या दिनापासून हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आल्याचे मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चामट यांनी सांगितले. गेल्या सात दिवसांपासून मंदिरात विविध धार्मिक आयोजन करण्यात आले. शुक्रवारी हनुमान जयंतीनिमित्त पहाटे ५ वाजता श्री हनुमंताला अभिषेक करण्यात आले. त्यानंतर आरती करून जन्मोत्सवाला सुरुवात करण्यात आली. सकाळपासूनच हजारो भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती. जवळपास ५० हजार भाविकांनी हनुमंतांचे दर्शन घेतल्याचे चामट यांनी सांगितले. आसपासच्या हनुमान भक्तांतर्फे येथे महाप्रसाद वितरण तसेच मठ्ठा वाटप करण्यात आले. मंदिर समितीच्यावतीने शनिवारी महाप्रसाद आणि भव्य पालखी, दिंडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर समितीच्या विश्वस्त मंडळामध्ये जयहिंद चापळे, नामदेव नाचणकर, प्रल्हाद गभणे, विठ्ठलराव राऊत, यशवंत कुथे, पांडुरंग क्षीरसागर, सूर्यभान तेलरांधे, उदाराम बोकडे, एच.टी. मेहर, विठ्ठल ढोबळे आदींचा समावेश आहे.
शरण शरण हनुमंता, तुज आलो रामदुता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 03:03 IST