नरेश डोंगरे
नागपूर : ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मैत्रीच्या नावाखाली अलगद जाळ्यात ओढून ‘सेक्स्टॉर्शन’ करणाऱ्या आरोपींचा हैदोस वाढला आहे. कुणाला सांगता येत नाही अन् बोलता येत नाही, अशा दुहेरी कोंडीत फसल्यामुळे अनेक जण ‘सेक्स्टॉर्शन’ करणाऱ्यांची तक्रार करीत नाहीत. उलट त्यांना भरभरून रक्कम देतात. त्यामुळे या टोळ्यांचे चांगलेच फावत आहे.
फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर या टोळ्यातील सदस्य २४ तास जाळे टाकून बसलेले असतात. तुम्ही राहत असलेल्या शहरात ‘ऑन कॉल सेक्स जॉब’ ऑफर करून व्हॉटस्अॅपवर प्रोफाईल मागवितात. तर, पाहताक्षणीच भुरळ घालणाऱ्या देखण्या तरुणीचे छायाचित्र (डीपी) ठेवून ‘मै अकेली हूं... मुझसे दोस्ती करोंगे’, असा थेट सवाल करत या टोळीतील गुन्हेगार सावज गळाला लावतात. या दोन्ही प्रकारात तुमच्या फोनमध्ये, इन्स्टा, फेसबुकमध्ये असलेली फ्रेण्डलिस्ट ‘सेक्स्टॉर्शन’ करणारी टोळी चोरते. दरम्यान, तुम्हाला मैत्रीच्या नावाखाली नको तसे फोटो, मेसेज पाठविले जाते. काही दिवस अशा प्रकारे विश्वास संपादन केल्यानंतर ‘ती’ देखणी मैत्रीण व्हिडिओ कॉल करून तुम्हाला कपडे उतरविण्यास भाग पाडते. जोशात येऊन जो कुणी हे कृत्य करतो, ते त्याच्यासाठी भयंकर ‘आपद’ ठरते. या व्हिडिओ कॉलनंतर तुमचा तुम्हालाच तो न पाहण्यासारखा व्हिडिओ पाठविला जातो. त्यानंतर ‘त्या’ देखण्या मैत्रिणीची भूमिका संपलेली असते. तिच्या मित्राच्या रूपातील खलनायक तुम्हाला फोन करतात. एवढी रक्कम तातडीने अमूक एका खात्यात जमा कर, नाही तर तुझ्या सर्व मित्र-मैत्रीणी आणि नातेवाइकांना तुझा हा व्हिडिओ पाठवू, अशी धमकी हे गुन्हेगार देतात. बदनामीच्या धाकाने पहिल्यांदा रक्कम दिली तर नंतर दुसऱ्या, तिसऱ्या अन् चौथ्यांदा रक्कम मागितली जाते. रक्कम देण्यास नकार दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शक्य होईल तेवढी रक्कम हे गुन्हेगार उकळतात. गेल्या काही दिवसात सीताबर्डीतील एक व्यापारी अन् रामदासपेठेतील एक तरुण ‘सेक्स्टॉर्शन’चा बळी ठरला आहे.
तक्रारदारांचे प्रमाण अत्यल्प
अशा प्रकारचे गुन्हे सर्वत्र मोठ्या प्रमाणात घडत असून, पोलिसांनाही त्याची कल्पना आहे. मात्र, बदनामीच्या भीतीने ७० ते ८० टक्के पीडित पोलिसांकडे तक्रारच करत नाही. अगदी नाकीनऊ आल्यानंतर काही जण तक्रार नोंदवतात. नागपुरात गेल्या वर्षी २०२१ मध्ये २३ तर यंदा चार महिन्यात ११ पीडितांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. यातील काहींनी २० ते तर काहींनी चक्क ३ लाखांपर्यंतची रक्कम ‘सेक्स्टॉर्शन’ करणाऱ्या टोळीला दिलेली आहे.
सराईत सायबर गुन्हेगार
अशा प्रकारे ‘सेक्स्टॉर्शन’ करणारे सायबर गुन्हेगार कमालीचे धूर्त असतात. आपण कुणाला दिसणार नाही अन् पोलिसांकडे तक्रार झाली तरी पकडले जाणार नाही, अशी तजवीज त्यांनी करून ठेवलेली असते. ते आपले सीम अन् मोबाईल वारंवार बदलवतात. त्यामुळे त्यांना पकडणे पोलिसांसाठी जिकिरीचे काम ठरते.
घाबरू नका, पोलिसांकडे या।
स्वत:चा विवस्त्रावस्थेतील अथवा आपत्तीजनक अवस्थेचा फोटो किंवा व्हिडिओ कुणालाच पाठवू नका. चुकून अशी चूक केली आणि नंतर तुम्हाला धमकी देऊन कुणी ब्लॅकमेल करत असेल तर घाबरू नका. थेट पोलिसांकडे तक्रार नोंदवा, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे यांनी केले आहे.
----