लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक कमी वेळेत व्हावी, यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन’ अंतर्गत किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील शेतकरी व विशेषत: संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. चार महिन्यांतच किसान रेल्वेच्या माध्यमातून विदर्भातील साडेसात हजार टनांहून अधिक संत्रा निर्यात करण्यात आले.
किसान रेल्वेतून माल पाठविल्यास शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात ५० टक्के सवलत मिळेल, असे १३ ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरपासून किसान रेल्वे सुरू झाली. आतापर्यंत २९ किसान रेल गाड्यांमधून ७ हजार ४९५ टन संत्र्यांची वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेला त्यातून २ कोटी ३४ लाखांचा महसूल प्राप्त झाला, तर शेतकऱ्यांना १ कोटी ५ लाख रुपयांची सबसिडी देण्यात आली.
नागपूर, अमरावती, वर्धा या तीन जिल्ह्यांतील हजारो हेक्टर क्षेत्रावर संत्र्याचे पीक घेतले जाते, शिवाय विदर्भात फळे व भाज्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. हा माल एरवी प्रामुख्याने ट्रकद्वारे राज्यात व देशात विविध ठिकाणी पाठवला जातो. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘ऑपरेशन ग्रीन’ हाती घेण्यात आले व त्यात किसान रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती.