नागपूर : सत्र न्यायालयाने शहरातील चर्चित पंकज पाटील खून प्रकरणातील बापलेकासह सात आरोपींना संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमोल हरणे यांनी हा आदेश दिला. ही घटना अजनी पोलिसांच्या हद्दीत घडली होती.
प्रणित मनोहर सुखदेवे, मनोहर चंपत सुखदेवे, नयन मार्कंड इलमकर, अमोल प्रकाश शेंडे, योगेश दीपक उके, अंकित भगवान वाघमारे व रणदीप किसान इंगोले (सर्व रा. कुंजीलालपेठ) अशी आरोपीची नावे आहेत. मयत पंकजचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्या मुलीचे दुसऱ्या मुलासोबत लग्न झाल्यामुळे पंकज नाराज होता. दरम्यान, ती मुलगी मुलाच्या बारशाकरिता नागपुरात आली होती. त्यानंतर ती सासरी परत जात असताना पंकजने पलाश वर्मा व सोनू पाटील या दोन मित्रांसोबत तिचा पाठलाग केला आणि तिच्या गाडीची काच फोडली. त्यामुळे मुलीचा नातेवाईक प्रणितने इतर आरोपींसोबत मिळून पंकजचा खून केला असे सरकारचे म्हणणे होते. सरकारने न्यायालयामध्ये आरोपींविरुद्ध ११ साक्षीदार तपासले. परंतु, त्यांना आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध करता आले नाही. आरोपींच्यावतीने ॲड. आर. के. तिवारी यांनी कामकाज पाहिले.