खेळले खेळले अन् उद्यानातच झोपले : सकाळी पुन्हा शाळेत परतले नागपूर : दोन शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या वृत्ताने गिट्टीखदान परिसरात गुरुवारी रात्री प्रचंड खळबळ उडवून दिली. पोलीस या मुलांची शोधाशोध करीत असताना ही दोन्ही बालके शुक्रवारी सकाळी शाळेत पोहचली. त्यांनी बेपत्ता होण्यामागचे कारणही सांगितले. ते ऐकून त्यांची आई, शाळा प्रशासन आणि पोलीस अशा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. चित्रांश (वय १२) आणि रिषभ (वय ८) हे दोन सख्खे भाऊ गिट्टीखदानमधील एका शाळेत शिकतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते शाळेत गेले. परंतु सायंकाळी घरी परतच आले नाही. त्यांची आई माधवी (काल्पनिक नाव) रात्री घरी पोहचली तेव्हा तिला मुले शाळेतून परतली नसल्याचे कळले. तिने प्रारंभी मुलांच्या मित्रांकडे विचारपूस केली. नंतर सरळ गिट्टीखदान ठाण्यात धाव घेतली. शाळकरी मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार आल्याने गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी तातडीनेआपल्या सहकाऱ्यांना मुलांचा शोध घेण्यासाठी कामी लावले. रेल्वेस्थानक, बसस्थानकांवर वेगवेगळी पोलीस पथके मुलांचा शोध घेऊ लागली. मुलांच्या आईवडीलांचे आपसात पटत नसल्यामुळे मुलांना घेऊन चार वर्षांपासून माधवी आपल्या माहेरी (गिट्टीखदानमध्ये) राहते तर, वडील शिवनी (मध्यप्रदेश) येथे राहतात. यापूर्वी एकदा वडिलांनी त्यांना सोबत नेले होते, अशी माहिती पुढे येताच ठाणेदार निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच मुलांच्या वडिलांशी संपर्क साधला. त्याने मुलाला सोबत नेल्याचा इन्कार केला. तो खोटा बोलत असावा, असा संशय घेत पोलिसांचे एक पथक शिवनीकडे रवाना करण्यात आले. रात्रभर शोधाशोध करूनही मुले हाती लागली नाही. त्यामुळे साऱ्यांचीच धाकधूक वाढली. पोलिसांचे एक पथक सकाळीच मुलांच्या शाळेत पोहचले. तेथे त्यांच्या वर्गमित्रांना विचारपूस सुरू असताना एका विद्यार्थ्याने हे दोघे भाऊ मानव सेवा नगरातील उद्यानात रात्री खेळत होते, अशी माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचे दुसरे एक पथक उद्यानाकडे रवाना झाले. त्याचवेळी दोघेही भाऊ शाळेत आले. रात्री उद्यानात मनसोक्त खेळल्यामुळे ते थकले आणि तेथेच एका कोपऱ्यात झोपी गेले. सकाळी उशिरा उठल्याने तशाच अवस्थेत ते शाळेत पोहचले, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.ते ऐकून त्यांच्या नातेवाईकांचाच नव्हे तर शाळा प्रशासन आणि पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.(प्रतिनिधी) आईच्या भावना अनावर अपहरणाच्या संशयामुळे मुलांची आई पुरती हादरली होती. तब्बल २४ तासानंतर मुलांना सुखरूप पाहून तिच्या भावना अनावर झाल्या. तिने दोघांनाही कवटाळून घेतले. कथित अपहरणाचा असा सुखद शेवट झाल्याने उपस्थितांसह पोलिसांनाही दिलासा मिळाला.
शाळकरी मुलांच्या कथित अपहरणामुळे खळबळ
By admin | Updated: February 4, 2017 03:00 IST