इतवारी स्थानकावर पोर्टेबल रॅम्पची सुविधा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात दिव्यांग, आजारी आणि ज्येष्ठ प्रवाशांसाठी इतवारी रेल्वेस्थानकावर पोर्टेबल अॅल्युमिनिअम रॅम्प उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वेगाडीत चढ-उतार करणे सोयीस्कर झाले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत सर्वप्रथम ही सुविधा इतवारी रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनातर्फे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवाशांना व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात येते. परंतु आता पोर्टेबल रॅम्पच्या मदतीने ते प्लॅटफार्मवरून व्हील चेअरच्या साह्याने कोचमध्ये चढू शकणार आहेत. या सुविधेसाठी प्रवाशांना इतवारी रेल्वेस्थानकावर पोहोचण्यापूर्वी येथील चौकशी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०७१२-२७६६०५८ किंवा रेल्वे क्रमांक ५३१३१ अथवा उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात दूरध्वनी क्रमांक ०७१२-२७६४३२४ या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या रेल्वेगाडीची, कोच, बर्थची माहिती पुरवावी लागणार आहे. ही माहिती पुरविल्यानंतर रेल्वे कर्मचारी पोर्टेबल रॅम्प योग्यरीत्या प्लॅटफार्म आणि कोचजवळ लावू शकणार आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या प्रयत्नाने ही सुविधा उपलब्ध झाली आहे. ही सुविधा नागपूर विभागातील इतर अ आणि ब श्रेणीच्या स्थानकांवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर ड श्रेणीच्या रेल्वेस्थानकावर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
आता सहज रेल्वेत चढू शकतील ज्येष्ठ नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:36 IST