भूखंड घेणाऱ्याची फसवणूक : आरोपीला पोलिसांचे अभय नागपूर : एकाच भूखंडाची दोघांना विक्री करून बापूराव चंपतराव कराळे (रा. अयोध्यानगर) याने भूखंड घेणाऱ्याची लाखोंनी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीवर अद्याप कसलीही कारवाई झाली नसून, त्याच्याविरुद्ध काढण्यात आलेला वॉरंटही त्याला तामिल होत नसल्याने कराळेला कुणाचे अभय आहे, असा प्रश्न चर्चेला आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूरच्या शक्तीनगरात राहणाऱ्या हिराचंद व्यंकटी ढोले यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी २०११ मध्ये आरोपी बापूराव कराळे (सचिव, ओमशांती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित नागपूर) कडून १४०० चौरस फुटाचा भूखंड चिचभुवनमध्ये खरेदी केला होता. त्यासाठी ढोले यांनी कराळेला ८ लाख ८९ हजार रुपये देऊन रितसर विक्रीपत्र करून भूखंडाचा ताबा घेतला. ढोले चंद्रपूर जिल्ह्यात राहत असल्याने ते वेळ मिळेल तेव्हा नागपुरात येऊन आपल्या भूखंडाची पाहणी करीत होते. मे २०१५ मध्ये त्यांना त्यांच्या भूखंडावर नंदकुमार अडकिने नामक व्यक्तीचा फलक दिसला. त्यामुळे त्यांनी अडकिने यांच्याशी संपर्क केला असता अडकिने यांनी तो भूखंड मोहनमूर्ती नामक व्यक्तीकडून विकत घेतल्याचे सांगून कागदपत्रे दाखवली. मोहनमूर्ती यांनी हा भूखंड बापुराव कराळेकडून १९८९ मध्ये विकत घेतला होता, असे उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. त्यामुळे ढोले यांनी कराळेंशी संपर्क करून एकच भूखंड दोघांना कसा काय विकला, त्याबाबत विचारणा केली. तेव्हा कराळेने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना दुसरा भूखंड देण्याचे आश्वासन देऊन दोन महिन्यांची मुदत मागून घेतली. धनादेश दिले परंतु वटलेच नाही दोन महिन्यानंतर कराळेने नवनवीन कारणे सांगून पुन्हा टाळणे सुरू केले. शेवटी ढोलेंना कराळेने भूखंडाची रक्कम परत करतो असे सांगून धनादेश दिले. मात्र, खात्यात रक्कम नसल्यामुळे हे धनादेश वटलेच नाहीत. इकडे अशा प्रकारे फसवणूक करून कराळेने लाखोंची रक्कम हडप केल्याने ढोले यांची अवस्था फारच वाईट झाली आहे. या संबंधाने ढोलेंनी कायदेशिर कारवाईचा मार्ग निवडला. त्यामुळे कराळेच्या नावाने प्रारंभी समन्स आणि आता वॉरंट निघाले. परंतु कराळे वॉरंट स्वीकारायला तयार नाही. तो उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात कराळे संबंधितांना दिशाभूल करणारी माहिती देऊन वॉरंट स्वीकारण्याचे टाळत असल्याचा ढोले यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)
एकाच भूखंडाची दोघांना विक्री
By admin | Updated: February 4, 2017 02:46 IST