आरोपी फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पल्सरचालकाने जोरदार धडक दिल्याने दुसऱ्या दुचाकीवरील सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाला. अमोल सोमाजी धावडे (वय ३५) असे मृताचे नाव असून ते पारडीच्या सोनबानगरात राहत होते. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री हा अपघात घडला.
धावडे आणि प्रशांत गोपीचंद चरडे (वय ३०) हे दोघे दुचाकीने गुरुवारी रात्री ७.४५ च्या सुमारास नंदनवनमधून जात होते. गंगाबाई घाटचाैकाजवळ प्रशांतच्या डोळ्यासमोर अचानक काही तरी आल्याने त्याने दुचाकी थांबवली. तेवढ्यात वेगात आलेल्या पल्सर (एमएच ४०य एझेड ६३५८) च्या चालकाने चरडेच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. यात चरडे आणि धावडे दोघेही खाली पडले. अपघातानंतर आरोपी पल्सरचालक पळून गेला.
गंभीर जखमी झालेल्या धावडेला नंदनवनमधील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी धावडेला मृत घोषित केले. प्रशांत चरडे यांच्या तक्रारीवरून नंदनवनचे सहायक पोलीस निरीक्षक शिर्के यांनी आरोपी पल्सरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
हेल्मेटमुळे चरडे बचावले
दुचाकीचालक प्रशांत चरडे हे हेल्मेट घालून होते. त्यामुळे या अपघातात ते खाली पडूनही डोक्याला दुखापत झाली नाही, म्हणून ते बचावले. धावडेंनी मात्र हेल्मेट घातले नसल्याने त्यांचा जीव गेला.
---
पतंगबाजीचा बळी ?
दुचाकीचालक प्रशांत चरडे याने पोलिसांनी डोळ्यासमोर काही तरी आल्यामुळे दुचाकी थांबवली अन् भरधाव पल्सरने तेवढ्यात धडक दिली, असे सांगितले असले तरी हे ‘काही तरी म्हणजे मांजा असावा’, असा संशय आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत पतंगबाजीला उधाण आले होते. त्यातील एखादी पतंग, मांजा तारांवर लोंबकळत असावी, हवेमुळे मांजा चरडेच्या तोंडावर आला असावा आणि त्यामुळेच त्याने दुचाकी थांबवली असावी, असाही कयास आहे.
----
((दुपारी दिलेल्या अपघाताच्या बातमीची ही सुधारित बातमी आहे))