लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांवर पाट्या टाकण्याचे काम पूर्ण झाले. या पाट्या चोरी होतात. त्यामुळे याची जबाबदारी आता बंधाऱ्याचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांकडे देण्यात येणार आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दिली.
अध्यक्षा बर्वे यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी जलव्यस्थापन समितीची बैठक झाली. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती भारती पाटील, नेमावली माटे, उज्ज्वला बोढारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीतनंतर पत्रकारांशी बोलताना बर्वे यांनी सांगितले, जिल्ह्यात सव्वासहाशेच्या जवळपास कोल्हापुरी बंधारे आहेत. यातील ६१४ बंधाऱ्यांवर पाट्या टाकण्यात आल्या. या वर्षी पहिल्यांदाच ९८ टक्के बंधाऱ्यांवर पाट्या टाकण्याचे काम पूर्ण झाले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी येथील पाण्याचा उपयोग होणार आहे. पण पाट्या चोरीला जातात. त्यामुळे याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांवर देण्याचा निर्णय घेण्यात आला. २५ जुन्या पिण्याच्या पाईप लाईन जीर्ण झाल्या आहेत. त्यांना बदलण्यासाठी शासनाकडे निधी मागण्यात येईल. ८३९ बोअरवेल बंद आहेत. त्यांना रेकार्डवरून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याते त्यांनी सांगितले.