नागपूर : सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांवर गेली. रविवारी २,२५२ नव्या रुग्णांची भर पडली, तर १२ रुग्णांना जिवाला मुकावे लागले. रुग्णांची एकूण संख्या एक लाख ७० हजार ५०२, तर मृतांची संख्या ४,४५९ झाली. विशेष म्हणजे, सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १६ हजार ६३०वर पोहोचल्याने कोरोनाची स्थिती गंभीर वळणावर आली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनमुळे स्थिती नियंत्रणात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर जिल्ह्यात आज १२ हजार ६७३ चाचण्या झाल्या. यात ९९२० आरटीपीसीआर, तर २,७५३ रॅपिड अँटिजेन चाचण्या होत्या. आरटीपीसीआरमधून २११०, तर अँटिजेनमधून १४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. चाचण्यांच्या तुलनेत आज बाधित रुग्णांचा दर १७.७७ टक्के आहे. रुग्णसंख्या व मृत्यूच्या संख्येची सार्वधिक नोंद झालेल्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत हा दर कमी आहे. एम्सच्या प्रयोगशाळेतून आज २७३, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ४३७, मेयोच्या प्रयोगशाळेतून २६६, नीरीच्या प्रयोगशाळेतून ११३, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून २३० तर खासगी लॅबमधून ७९१ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
-शहरात पहिल्यांदाच गेली १८००वर रुग्णसंख्या
कोरोनाच्या या १२ महिन्यांच्या काळात पहिल्यांदाच शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या १८००वर गेली. आज १८३७ रुग्ण व सात मृत्यूची नोंद झाली. ग्रामीणमध्ये मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर आहे. आज ३७८ रुग्ण व तीन मृत्यू झाले. जिल्ह्याबाहेरील दोन रुग्ण व दोन मृत्यू झाले. शहरात आतापर्यंत एकूण एक लाख ३६ हजार ३१७ रुग्ण व २,८६७ मृत्यू झाले. ग्रामीणमध्ये ३,३२०६ रुग्ण व तीन बळी गेले. जिल्हाबाहेरील ९७९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ७९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
-रुग्ण बरे होण्याचा दरात सात टक्क्याने घसरण
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर गेला होता. परंतु दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण वाढताच यात ७ टक्क्याने घट होऊन ८७.६० टक्क्यांवर आला आहे. आज १०३३ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या एक लाख ४९ हजार ४१३ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात हजाराखाली गेलेली सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १६ हजार ६३० झाली. यातील ४,५५९ रुग्ण रुग्णालयात तर १२,०७१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
- आठवड्याभरात १२,७७३ रुग्णांची नोंद
१ ते ७ मार्च या आठवड्यात ७,९४१ नवे रुग्ण आढळून आले, तर ५५ मृत्यूची नोंद झाली. मागील आठवड्यात ८ ते १४ मार्चदरम्यान रुग्णसंख्येत वाढ झाली. १२ हजार ७७३ नव्या रुग्णांची भर पडली असून, ६९ रुग्णांचे बळी गेले. पुढील काही दिवसांत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-मेयो, मेडिकलमध्ये २५०वर रुग्ण
रुग्णवाढीचा मोठा भार मेयो, मेडिकलवर पडत आहे. सध्याच्या स्थितीत मेडिकलमध्ये २५६, तर मेयोमध्ये २६० रुग्ण भरती आहेत. एम्समध्ये ६२, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ५५, पाचपावली महिला रुग्णालयात ५, तर आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये १३ रुग्ण आहेत. पाचपावली कोविड केअर सेंटरमध्ये १२०, तर व्हीएनआयटी कोविड केअर सेंटरमध्ये २२ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनाची स्थिती
दैनिक चाचण्या: १२,६७३
ए. बाधित रुग्ण : १,७०,५०२
सक्रिय रुग्ण : १६,६३०
बरे झालेले रुग्ण : १,४९,४१३
ए. मृत्यू : ४४५९