नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य स्पर्धेतील काव्यात्मक व भावनात्मक अनुभूतीचे नाटक ‘ऋतुस्पर्श’ रसिकांची पसंती मिळवून गेले. आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटतेने जुळलेल्या सहा ऋतूंच्या निकट अनुबंधाचा वेध घेणारे हे नाटक नितीन नायगावकर या नवोदित नाटककाराच्या कुशल लेखन प्रतिभेचा परिचय देणारे होते. हे नाटक श्याम पेठकर लिखित ‘ऋतुस्पर्श’ या ललितबंधावर आधारित होते. लेखक, दिग्दर्शक व सहभागी कलाकारांनी दर्शकांना पहिल्या प्रयत्नातच जिंकले. मानवी जीवनात अविरतपणे फिरणाऱ्या ऋतुचक्राचे रंगरूप व गंध वेगळाच. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अल्लड बालपण, नवथर यौवन, भावुक तारुण्य आणि उत्तरार्धातील आश्वस्त प्रौढत्व व्यक्तिनुरूप विविध अनुभवांचे असते. मात्र जगण्याच्या प्रत्येक वळणावर कितीही खाचखळगे आले, अडचणी आल्या तरी शेवटच्या श्वासापर्यंत आपली ओंजळ सुगंधी फुलांनी भरलेली राहण्यासाठी या जगण्यावर, अवतीभवतीच्या माणसांवर, निसर्गातल्या पानाफुलांवर, पक्ष्यांवर मनापासून प्रेम करायला हवे. गावाकडच्या उन्मुक्त वातावरणातील व बंदिस्त शहरातील ऊन-पाऊस-थंडीची अनुभूती नक्कीच वेगळी असते. ज्या शहरात बदलत्या ऋतूंची चाहूल जाणवत नाही, त्या शहरांना खरंतर आभाळच नसते. अन् ज्या तरुण-तरुणींच्या जीवनात प्रीतीची अनिवारता, स्थिरता असते, त्यांच्या जीवनात प्रत्येक ऋतूचे आगमन म्हणजे जणू नवसृजनाचा आनंदोत्सवच असतो. दैनंदिन जीवनातील अशा विविधांगी प्रसंग मालिकांना काव्यात्मक शैलीच्या संवादासह सादर करणारे सूत्रधार विनोद तुंबडे, दिनेश चंदनकर, रेणुका चुटके, मधू जोशी, श्रद्धा तेलंग, निधी चरपे, नमिता माने, ओंकार मुळे, आकाश डोंगरे, हर्षल तामणे, वासंती म्हेत्रे या कलाकारांचे हे सकस सादरीकरण होते. दिग्दर्शन मीनल इथापे, सहदिग्दर्शन कल्याणी उपाध्ये, संगीत भय्या पेठकर तर निर्मिती समीर पंडित यांचे होते.(प्रतिनिधी)
मनाला स्पर्श करणारे ‘ऋतुस्पर्श’
By admin | Updated: November 26, 2014 01:06 IST