लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संशोधनातून संस्कृतीचा शोध घेणे अपेक्षित असते. मात्र, आजकाल केवळ आकडेवारीच दर्शवण्याची स्पर्धा लागलेली आहे. इतिहासातून नवराष्ट्र निर्मितीचे बीजारोपण होण्याची दृष्टी इतिहासकाराला असली पाहिजे. डॉ. भालचंद्र अंधारे त्याच दृष्टीचे इतिहास संशोधक होते, अशी भावना सद्गुरुदास महाराज यांनी व्यक्त केली.
डॉ. भालचंद्र अंधारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमरावती मार्गावरील भरतनगर येथील भास्कर सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत राजे मुधोजी भोसले, ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, ए. आर. काळबांडे उपस्थित होते.
अंधारे यांनी इतिहास संशोधनासोबतच आपले आत्मचरित्रही लिहिले आहे. मात्र, प्रकाशन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले, असे सद्गुरुदास महाराज यावेळी म्हणाले. अंधारे यांनी नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाचा परिचय वर्तमानाला करवून देताना भविष्याला मोठा आधार दिल्याची भावना श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी प्रा. श्रीकांत सोनटक्के, डॉ. शुभा जोहरी, डॉ. राजेंद्र वाटाणे, डॉ. श्याम कोरेटी, डॉ. रफीक शेख, संजय देशकर, दत्तात्रय गारवे, चैतन्य अंधारे उपस्थित होते. संचालन प्रसन्न बारलिंगे यांनी केले.