एस.पी.गौतम : ‘नीरी’त जागतिक पर्यावरण दिवस साजरालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. हरित तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येकाने शक्य असेल तेथून ज्ञान व माहिती मिळवायला हवी. आध्यात्मिक पुस्तक, ग्रंथांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत मौलिक माहिती आहे. या विज्ञानाला आजच्या तंत्रज्ञानाची जोड दिली तर ही माहिती मार्गदर्शक ठरू शकते, असे मत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण आयोगाचे माजी अध्यक्ष व मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे सदस्य प्रा.एस.पी.गौतम यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त ‘सीएसआयआर-नीरी’ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.‘नीरी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर मनपाचे आयुक्त अश्विन मुद्गल, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, विज्ञान सचिव डॉ.जे.एस.पांडे, वरिष्ठ प्रधान संशोधक प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ आणि हवामान बदलापासून पृथ्वीला वाचविणे हे मोठे आव्हान आहे. कार्बन आणि ओझोनचे संतुलन साधले गेले पाहिजे, असे प्रा.गौतम यांनी प्रतिपादन केले. अश्विन मुद्गल यांनी नागपुरातील सांडपाणी प्रक्रिया व घनकचरा व्यवस्थापनाशी निगडित समस्यांवर भाष्य केले. यासंदर्भात सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. डॉ.राकेश कुमार यांनी प्रास्ताविकादरम्यान ‘नीरी’ने घेतलेल्या पुढाकारांवर प्रकाश टाकला. सांडपाणी प्रक्रिया व वायूप्रदूषण नियंत्रणाच्या क्षेत्रात ‘नीरी’ने सामंजस्य करार केल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. ‘नीरी’तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘नीरी’च्या कर्मचाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन केले होते.‘मोफत अन्न व ऊर्जा : हा शाश्वत उपाय आहे का?’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. अजय द्विवेदी, विकास गुप्ता हे अनुक्रमे पहिले व दुसरे विजेते ठरले. तसेच ‘शहरातील पर्यावरण व्यवस्थापनात नागरिकांची भूमिका’ या मुद्यावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. मुख्य कार्यक्रमाचे संचालन जया सब्जीवाले यांनी केले तर प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.‘नीरी’-‘व्हीआयए’दरम्यान सामंजस्य करार‘विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन’ व ‘नीरी’दरम्यान सामंजस्य करारदेखील करण्यात आला. या करारानुसार नागपूर विभागातील कारखान्यांना ‘नीरी’तर्फे पर्यावरण रक्षण व नियंत्रणासंदर्भात मदत केली जाणार आहे. ‘व्हीआयए’चे अध्यक्ष अतुल पांडे व ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी ‘व्हीआयए’चे उपाध्यक्ष सुरेश राठी, सचिव डॉ.सुहास बुधे उपस्थित होते.
आध्यात्मिक ग्रंथांमधील विज्ञान मार्गदर्शक
By admin | Updated: June 6, 2017 01:51 IST