नागपूर: जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इमारत आता एका देखण्या स्वरूपात उभी राहात असून ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. इमारत बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. बचत भवनाच्या इमारत नूतनीकरणाचे काम गत चार महिन्यांपासून सुरू आहे. अधिवेशन काळातच उद््घाटन करण्याचा प्रशासनाचा बेत होता. परंतु काम पूर्ण होऊ न शकल्याने तो रद्द झाला. जुनी इमारत पारंपरिक स्वरुपाची होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांसह निवडणुकीच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका व प्रशिक्षण यासह इतरही कामासाठी त्याचा वापर केला जात होता. मात्र देखभाल दुरुस्तीअभावी इमारतीची लया गेली होती. पावसाळ्यात गळत होती. भिंतीवरही ओल येत होते. फर्निचरचीही अवस्थाही वाईट झाली होती. विद्यमान जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर बचत भवनाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला. ९६ लाख रुपये खर्च करून बचत भवनाला नवे रूप देण्यात आले आहे. कॉर्पोरेट कंपनीचे कार्यालय शोभावी अशी ही वास्तू उभी झाली आहे. बैठक व्यवस्थाही उत्तम करण्यात येत आहे. नव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीचे उद््घाटन होण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाचेही टप्प्या टप्प्याने नूतनीकरण केले जाणार आहे. इमारतीच्या बाह्यरूपाला कुठलाही धक्का न लागता बांधकाम करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. सेतू कार्यालय आणि तहसील कार्यालयालाची दुरुस्ती करण्याचाही प्रस्ताव आहे. सेतू कार्यालयात अद्ययावत ‘रेकॉर्ड रूम’ तयार केली जात आहे. (प्रतिनिधी)
बचत भवनाचा मेकओव्हर
By admin | Updated: January 3, 2015 02:38 IST