तानाजी वनवे यांचा दावा : रेकॉर्डवर पुरावा नसल्याचे सांगितले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नगरसेवक संजय महाकाळकर हे मान्यताप्राप्त गटनेता नव्हते. त्यांच्या नियुक्तीला महापौरांनी मान्यता दिली नव्हती. मान्यतेविषयी रेकॉर्डवर काहीच पुरावा उपलब्ध नाही, असा दावा नगरसेवक तानाजी वनवे यांचे वकील सुनील मनोहर यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी होत आहे. महाकाळकर यांचे वकील एस. के. मिश्रा यांनी बुधवारी उर्वरित युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर मनोहर यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यांनी वरील मुद्यासह आणखी काही महत्त्वाच्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन वनवे यांची गटनेता पदावरील नियुक्ती नियमानुसार असल्याचे सांगितले. वनवे यांना बहुसंख्य नगरसेवकांचा पाठिंबा आहे. त्यामुळे महाकाळकर हे गटनेतापदी कायम राहू शकत नाहीत. विभागीय आयुक्तांनी वनवे यांच्या बाजूने दिलेला निर्णय वैध आहे, असा दावाही मनोहर यांनी केला. त्यांचा युक्तिवाद अपूर्ण असून ते उर्वरित युक्तिवाद गुरुवारी करणार आहेत. महानगरपालिकेत काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. सुरुवातीला महाकाळकर यांची निर्धारित प्रक्रियेद्वारे गटनेतापदी निवड करण्यात आली होती. त्यांनी गटनेतेपदाची सूत्रे स्वीकारून कामाला सुरुवात केली होती. दरम्यान, महाकाळकर यांच्याविरुद्ध १६ मे रोजी वर्धा मार्गावरील प्रगती भवन येथे नगरसेविका हर्षला साबळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नगरसेवकांची बैठक झाली. त्यात वनवे यांची गटनेतापदी निवड करण्याचा निर्णय घेऊन, विभागीय आयुक्तांना १७ नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी १९ मे रोजी वादग्रस्त आदेश जारी केला. त्याद्वारे महाकाळकर यांना गटनेता पदावरून कमी करून वनवे यांची गटनेतापदी निवड ग्राह्य धरण्यात आली. याविरुद्ध महाकाळकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
संजय महाकाळकर मान्यताप्राप्त गटनेता नव्हते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:50 IST