नागपूर : पाच हजारावर गुंतवणूकदारांना २०० कोटीवर रुपयांनी लुबाडणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशीने नागपूरसह अकोल्यातील गुन्ह्यांमध्येही जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यात न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावून, दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
अर्जावर न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणात जोशीसह एकूण २४ आरोपींचा समावेश आहे. जोशीला १५ ऑक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो कारागृहात आहे. जोशी व इतर आरोपींविरुद्ध अकोल्यातील खदान पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. या प्रकरणाचा खटला सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. जोशी गुंतवणूकदारांना वार्षिक २५ ते ४० टक्के व्याजाचे आमिष दाखवीत होता. गुंतवणूकदारांना फसविण्यासाठी त्याने अनेक शहरात एजंट नियुक्त केले होते. काही काळानंतर गुंतवणूकदारांना परतावा व ठेवी मिळणे बंद झाल्यामुळे या मायाजाळाचा पर्दाफाश झाला. जोशीतर्फे ॲड. संग्राम सिरपूरकर यांनी कामकाज पाहिले.