कामठी तालुक्यातील ९ ग्रा.पं.साठी १०० उमेदवारी अर्ज दाखल
कामठी : कामठी तालुक्यातील नऊ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. तालुक्यातील भामेवाडा ग्रा.पं.मध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी अर्ज केल्याने येथील निवडणूक अधिक रंजक होण्याची शक्यता आहे. येथे विद्यमान सरपंच कविता सुरेश बांगडे यांनी वॉर्ड क्रमांक ३ मधून महिला सर्वसाधारण संवर्गातून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यांचे पती सुरेश पुजाराम बांगडे यांनी वॉर्ड क्रमांक २ मधून इतर मागास वर्गातून तर त्यांची सून शिल्पा नितीन बांगडे यांनी वॉर्ड क्रमांक २ मधून सर्वसाधारण महिला संवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुरेश बांगडे व कविता बांगडे हे दोघेही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. इकडे तालुक्यात मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत विविध ग्रा.पं.साठी १०० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यात कोराडी (२८), लोणखैरी (७), खेडी (२१), टेमसना (७), केसोरी (७),भामेवाडा (५), महालगाव (१५), पवणगाव (०७) तर घोरपड ग्रामपंचायतसाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात सकाळपासून उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी उसळली होती. घोरपड ग्रामपंचायतीत वाॅर्ड क्रमांक १ मधून उच्चशिक्षित तरुणी पार्वती शेषराव मसमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोराडी ग्रामपंचायतसाठी प्रहार संघटनेच्या वतीने महादुला नगरपंचायतचे नगरसेवक मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वात ६ प्रभागातून १७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.