अभिमन्यू निसवाडे : हजार अॅन्जिओग्राफीच्या रुग्णांमधून २९५ रुग्णांचे शुल्क केले परतलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या रुग्णाची ‘अॅन्जिओग्राफी’नंतर ‘अॅन्जिओप्लास्टी’ किंवा ‘बायपास सर्जरी’ करण्याची गरज पडत नाही, त्या रुग्णाचा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत कोणताही क्लेम यशस्वी होत नाही. यामुळे त्यांना स्वत:च्या पैशाने रोगनिदान करावे लागते, ही बाब महाराष्ट्रभर सर्व रुग्णालयात सारखीच असून याच तत्त्वावर चालविण्यात येते. जर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये क्लेम प्राप्त झाला नाही, तर रुग्णांचे पैसे संस्थेला भरावे लागतात आणि संस्थेमध्ये मोफत अॅन्जिओग्राफी करण्यात यावी, असा शासनाचा कुठलाच निर्णय नसल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सांगितले.‘लोकमत’ने ‘पाच हजार भरा, तरच अॅन्जिओग्राफी’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तावर निसवाडे यांनी प्रशासनाची बाजू मांडली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ८ जून २०१७ पर्यंत एक हजार रुग्णांवर अॅन्जिओग्राफी करण्यात आली. त्यापैकी २९५ रुग्णांना प्रति रुग्ण पाच हजार रुपये प्रमाणे अॅन्जिओग्राफीचे पैसे परत करण्यात आले आहेत. तर ३२९ रुग्णांवर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदयरोगचिकित्सा विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये ‘कोरोनरी आरट्री डिसीज’ असल्याची शंका निर्माण झाल्यावर रुग्णांना भरती करून ‘अॅन्जिओग्राफी’ करण्यात येते. ‘अॅन्जिओग्राफी’ केल्यानंतर ज्या रुग्णांमध्ये आजार आढळतो अशा रुग्णांना अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीसाठी रुग्णालयात भरती करण्यात येते. त्याच रुग्णांचा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत क्लेम आल्यानंतर ‘अॅन्जिओग्राफी’चे भरलेले शुल्क परत केले जाते. रुग्णांकडून कुठलेही पैसे उकळले जात नाही, असेही ते म्हणाले.
मोफत अॅन्जिओग्राफीचा शासनाचा निर्णय नाही
By admin | Updated: June 13, 2017 02:03 IST