नागपूर : आरटीपीसीआर टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना त्यांची रिपाेर्ट व्हाॅट्सॲपवर पाठविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रयाेगशाळांना दिले आहेत. संक्रमित रुग्णाची माहिती २४ तासाच्या आत आयसीएमआर पाेर्टलवर अपलाेड करण्याच्या आणि निगेटिव्ह व्यक्तीचचे रिपाेर्ट ७ दिवसांच्या आत आयसीएमआर पाेर्टलवर अपलाेड करण्याची सूचनाही न्यायालयाने दिली.
न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्या. अमित बाेरकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी हे आदेश दिले. आदेशाचे पालन न केल्यास प्रयाेगशाळांवर कठाेर कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्राधिकरणाला न्यायालयाने दिले. आरटीपीसीआर टेस्टचे रिपाेर्ट मिळायला उशीर हाेत असल्याचा विषय घेत न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना मध्यस्थ डाॅ. मुकेश चांडक यांनी आरटीपीसीआर टेस्टचे रिपाेर्ट उशिरा मिळत असल्याने रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे मत मांडले. प्रयाेगशाळांकडून उशीर केला जात असल्याने रुग्णांना वेळेवर रिपाेर्ट मिळत नाही सर्व्हर मंद राहिल्याने आयसीएमआरच्या वेबसाईटवरही रिपाेर्ट अपलाेड हाेण्यास उशीर हाेत असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालय मित्र ॲड. श्रीरंग भंडारकर यांनी आरटीपीसीआर टेस्ट पाॅझिटिव्ह असाे की निगेटिव्ह, ती व्यक्तीच्या व्हाॅट्सॲपवर पाठविण्याचा उपाय न्यायालयास सुचविला. आयसीएमआरच्या वेबसाईटवर अपलाेड झाली नसल्याच्या कारणाने रिपाेर्ट अडवून ठेवू नये. त्यामुळे सरकार आणि संबंधित प्राधिकरण त्या आधारावर आवश्यक निर्णय घेऊ शकेल.