विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनचा इशारानागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाहतुकीच्या विरोधात सोमवारी विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनने प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांना ५० च्यावर आॅटो मीटर भेट म्हणून दिले. परंतु शेळके यांनी अवैध वाहतुकीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तूर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अवैध वाहतूक थांबली नाही तर आरटीओला आॅटोरिक्षाच‘गिफ्ट’करू, असा इशारा फेडरेशनने दिला आहे.३० नोव्हेंबरपर्यंत अवैध वाहतूक न थांबल्यास आॅटोरिक्षा मीटरने न चालवण्याचा व आॅटो मीटर आरटीओला भेट देण्याचा इशारा विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनने दिला होता. त्यानुसार फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वात आज दुपारी ३ वाजता आरटीओ, शहर कार्यालयाच्या समोर ३०० च्यावर आॅटोचालकांनी नारे-निदर्शने केली. ४.३० वाजता शेळके यांनी फेडरेशनच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविले. फेडरेशनने आपली भूमिका मांडत ५० च्यावर आॅटो मीटर शेळके यांना भेट म्हणून दिले. यावर शेळके यांनी अवैध वाहतुकीवर चालू असलेल्या कारवाईची माहिती दिली, सोबतच हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विविध कार्यालयातून मदतीसाठी आलेल्या मोटार वाहन निरीक्षकाचाही यात समावेश केला जाईल, असे सांगून आॅटो मीटरनेच चालवण्याचे आवाहन केले.‘लोकमत’शी बोलताना भालेकर म्हणाले, शेळके यांनी २४ डिसेंबरपर्यंत अवैध वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे तूर्तास आम्ही आंदोलन मागे घेतले आहे. परंतु ३१ डिसेंबरपर्यंत शहरातील अवैध वाहतूक थांबली नाही तर १ जानेवारीपासून आॅटोरिक्षाच आरटीओला भेट म्हणून देण्याची तयारी करणार आहोत. आरटीओ व पोलीस वाहतूक विभाग एकीकडे आॅटो मीटरची सक्ती करते, परंतु अवैध वाहतूक बंद करीत नाही. कमी पैशात प्रवास होतो म्हणून प्रवासी अवैध वाहतुकीतून प्रवास करतात. दुसरीकडे आॅटोरिक्षा विना मीटर धावत असल्यास त्याच्यावर कारवाई होते. परिणामी आॅटोरिक्षाचालक अडचणीत सापडला आहे. अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने यावर त्वरित तोडगा काढावा,अशी आमची मागणी आहे. फेडरेशनच्या शिष्टमंडळात आनंद चवरे, रवी तेलरांधे, शिवराज करोपटे, जावेद शेख, रोशन रामटेके, अल्ताफ अन्सारी, किशोर सोमकुवर व रवी सुखदेवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
-तर आरटीओला आॅटो ‘गिफ्ट’
By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST