नागपूर : सव्वा कोटीच्या लक्झरी कारमुळे झालेल्या हाय प्रोफाईल अपघाताच्या तपासात गुन्हे शाखेला जखमी विद्यार्थी आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयातर्फे संशयास्पद भूमिका घेण्यात आल्याचे समजले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानंतर गुन्हे शाखा अपघाताशी निगडित पुरावे गोळा करण्याच्या कामाला लागली आहे.
हा अपघात २५ जानेवारीला रात्री १० वाजता घडला होता. व्हॉल्वो कारमध्ये स्वार तीन विद्यार्थी मोक्षधाम चौक ते धंतोली ठाण्याच्या दिशेने जात होते. कारचा वेग अधिक असल्यामुळे कार अनियंत्रित होऊन धंतोली झोन कार्यालयाच्या भिंतीला धडकली. या अपघातात कार चालक आयुष हेमंत गोयल, धंतोली, त्याचा साथीदार आयुष मनीष अग्रवाल आणि प्रतीक खंडेलवाल जखमी झाले होते. प्रतीक आयुषच्या शेजारी बसला होता. कारचे बलून उघडल्यामुळे दोघांचा जीव वाचला होता. परंतु मागे बसून असलेला मनीष अधिक जखमी झाला होता. जखमी झाल्यामुळे तिघेही घटनास्थळावरून रवाना झाले होते. धंतोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला होता. प्रकरणात धंतोली पोलिसांनी हलगर्जीपणा दाखविल्याचे तसेच अपघातातील विद्यार्थी हाय प्रोफाईल कुटुंबातील असल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यांनी धंतोली पोलिसांना फटकारून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. तिघेही विद्यार्थी मेडिकल चौकातील ट्रिलियम मॉल येथील एका रेस्टॉरन्टमधून घरी परत जात होते. पोलिसांनी मॉलपासून घटनास्थळापर्यंत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यात तिघांव्यतिरिक्त इतर कुणी कारमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आयुष गोयलला आरोपी बनविण्यात आले. अपघातानंतर विद्यार्थ्यांवर धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नियमानुसार रुग्णालयास जखमी रुग्णांची सूचना संबंधित ठाण्यात द्यावी लागते. दोन्ही रुग्णालयांनी याची पोलिसांना माहिती दिली नाही. पोलीस आयुक्तांनी बुधवारी दोन्ही रुग्णालयाच्या संचालकांना बोलाविले. त्यांनी बेजबाबदार डॉक्टरचे नाव सांगून अशी घटना भविष्यात घडणार नाही, याबाबत काळजी घेण्याची तंबी दिली.
......
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
अपघातानंतर विद्यार्थ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्याला वाचविण्यासाठी कारमध्ये ड्रायव्हर असल्याचे सांगितले होते. त्यांचे हे कृत्य पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न ठरला. यामुळे विद्यार्थ्यांसोबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आरोपी बनविले जाऊ शकते. पोलीस आयुक्तांच्या सक्तीमुळे या प्रकरणाशी निगडित असलेल्यांमुळे खळबळ उडाली आहे.
..............