दोन डीलरचा वाद : नेटवरील डेमो क्रॅक करून वापर करणारे मोकळेच सतीश येटरे - यवतमाळ डिजिटल प्रिंटिंग व्यवसायाला विविध सॉफ्टवेअरच्या वापराने चांगले दिवस आले. मात्र महागडे सॉफ्टवेअर घेण्याऐवजी बहुतांश व्यावसायिक इंटरनेटवरील डेमो क्रॅक करून त्याचा वापर करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सॉफ्टवेअर कंपन्यांच्या तज्ज्ञांनी आता परवानाकृत सॉफ्टवेअर खरेदी करणाऱ्या प्रिंटिंग व्यावसायिकांनाच लक्ष्य केले आहे. खरेदीवरून दोन डीलरमध्ये निर्माण झालेल्या वादाचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे. खिळ्यांपासून सुरू झालेला प्रिंटिंग व्यवसाय आता अत्याधुनिक सॉफ्टवेअरपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. फ्लेक्स, ग्राफिक्स डिझाईन, आॅफसेट, स्क्रीन, डीटीपी, रेडिअम वर्क, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रसारण आदींसाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. अधिकाधिक आकर्षक आणि दर्जेदार प्रिंटिंग कामासाठी याचा उपयोग केला जात आहे. त्यासाठी १० हजार रुपयांपासून तर ६० हजार रुपयांपर्यंत किमतीचे सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत. त्यासाठी सॉफ्टवेअर विक्रेत्या कंपन्यांनी प्रमुख ठिकाणी घाऊक विक्रेते (डीलर) नेमले आहेत. मायक्रोसॉफ्ट, कोरल आॅपरेशन, अॅडॉब या कंपन्यांच्या प्रिंटिंग सॉफ्टवेअरला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यवतमाळातील व्यावसायिक हे सॉफ्टवेअर नागपूर येथून खरेदी करतात. कोरल ड्रॉ, फोटोशॉप, विन्डोज आॅपरेटिंग सिस्टीम असे परिपूर्ण सॉफ्टवेअर खरेदी करण्याकडे व्यावसायिकांचा कल आहे. सॉफ्टवेअर खरेदी केल्यानंतर त्याचा अधिकृत परवाना दिला जातो. यवतमाळात अनेक व्यावसायिकांनी अधिकृत सॉफ्टवेअर खरेदी करून त्याचा व्यवसायासाठी उपयोग चालविला आहे. असे असताना या कंपन्यांनी सॉफ्टवेअरच्या नमुन्यादाखल नेटवर टाकलेला डेमो क्रॅक करून त्याचा वापर करण्याचा उपद्व्याप चालविला आहे. ही बाब सदर कंपन्यांच्या लक्षात आली. त्यांनी ही गंभीर बाब रोखण्यासाठी पायरसी तज्ज्ञ नेमले. ते डीलरच्या अधिपत्याखाली कर्तव्य बजावतात. आपल्याकडून सॉफ्टवेअर खरेदी केले नाही म्हणून नागपूरच्या दोन डीलरमध्ये वाद उद्भवला आहे. ते स्वत:च्या ग्राहकांना सुरक्षित ठेवून विरोधी डीलरच्या ग्राहकांकडे पोलिसांसह धाडी घालतात. दोष नसताना आणि अधिकृत सॉफ्टवेअर असताना क्षुल्लक कारण पुढे करून कारवाईचा बडगा उगारतात. शिवाय पैशाची मागणीही करतात. यवतमाळ जिल्ह्यात अशी दोन उदाहरणे नुकतीच पुढे आली. मात्र डेमो क्रॅक करून सॉफ्टवेअरचा वापर करणारे मोकळेच आहेत. त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येते. वादात दोघांवर कारवाईयवतमाळ जिल्ह्यात सुमारे सात हजार प्रिंटिंग व्यावसायिक आहेत. त्यातील मोजक्या लोकांकडेच अधिकृत सॉफ्टवेअर आहेत. त्यांच्यावर पायरसीच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. मात्र यवतमाळातील अल्कशा अॅडस् आणि पुसद येथे एका वाहिनीचे प्रसारण करणाऱ्यांकडे धाड घालून पायरसी अधिकाऱ्यांनी कारवाई केली. विशेष असे, अल्कशाकडे अधिकृत सॉफ्टवेअर होते. मात्र दुकानातील दुसऱ्या संगणकात अधिकृत सॉफ्टवेअर नसल्याचा हवाला देत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. हाच प्रकार पुसद येथेही झाला. नागपूर येथील दोन डीलरच्या वादाचा फटका आपल्याला बसल्याचे प्रिंटिंग व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पायरसीमुळे प्रिंटिंग व्यावसायिकांची लूट
By admin | Updated: February 4, 2015 00:52 IST