नागपूर : दोन महिन्यांचा पगार न दिल्यामुळे चिडलेल्या अल्पवयीन मुलाने मालकाच्या घरात चोरी केली. कपिलनगर पोलिसांनी या अल्पवयीन मुलास १.३३ लाख रोख व दागिन्यांसह ताब्यात घेतले आहे.
कपिलनगर येथे शिवकरण यादव यांचे चहा-नाश्त्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात १५ वर्षीय मुलगा काम करीत होता. त्याचे यादव यांच्या घरी येणे-जाणे होते. यादवने त्याला गेल्या दोन महिन्यांपासून पगार दिला नसल्याचे सांगितले जात आहे. यादवने पगार देण्यास टाळाटाळ केली असल्याने त्या अल्पवयीन मुलाने चोरीची योजना आखली. २६ जानेवारीला सकाळी यादव कुटुंबासह दुकानात आले होते. घरात कोणीच नव्हते. या संधीचा लाभ घेत अल्पवयीन मुलाने कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व दागिन्यांवर हात साफ केला. घरी परतल्यावर यादवला घरात चोरी झाल्याचे कळले.
कपिलनगर पोलिसांनी चोरीच्या प्रकरणाची नोंद करीत तपास सुरू केला. तपासात सीसीटीव्हीमध्ये संशयित अल्पवयीन आढळून आला. त्यानंतर हा मुलगा यादवच्या दुकानात काम करीत असल्याची माहितीही मिळाली. पोलिसांनी या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २८ हजारांची रोख रक्कम आणि १.३३ लाख रुपयांचे दागिने जप्त केले. ही कारवाई डीसीपी मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात पीआय अमोल देशमुख, शुभांगी वानखेडे, पीएसआय भरत जाधव, एएसआय संजय वानखेडे, शिपाई अरविंद काळबांडे, आशिष सातपुते, गणेश साहुसाखडे व अश्विन जाधव यांनी केली.
..........