लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : माैदा तालुक्यातील खात-वायगाव राेडचे वर्षभरापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. परंतु, अल्पावधितच या राेडवर खड्डे तयार झाले. या कामातील भ्रष्टाचार दडपण्यासाठी राेडवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली, मात्र तेही काम निकृष्ट प्रतीचे करण्यात आले आहे.
या राेडच्या दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम निकृष्टप्रतीचे करण्यात आल्याने तसेच राेडवर खड्डे पडल्याने यासंदर्भात ‘लाेकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कंत्राटदाराने राेडरील खड्ड्यांना ठिगळं लावायला सुरुवात केली. यात गिट्टीची चुरी अधिक व डांबर कमी वापरल्याने आठवडाभरात खड्डे जैसे थे हाेऊन गिट्टीची चुरी राेडवर पसरली. त्यावरून दुचाकी वाहने स्लीप हाेऊन अपघात हाेत आहेत.
या राेडचे डांबरीकरण करताना तसेच खड्डे बुजविताना समतलपणाला फाटा दिला आहे. त्यामुळे हा राेड उंच सखल झाल्याने वाहने चालविताना त्रास हाेताे. वाहने उसळत असल्याने अपघातही हाेतात. शिवाय, या राेडवरील खड्डे वाहनचालकांना दुरून दिसत नाहीत. त्यामुळे चालकांची माेठी गफलत हाेते आणि वाहन खड्ड्यात शिरून उसळते. या राेडवरील वळणांवर गिट्टीची चुरी माेठ्या प्रमाणात पसरली असल्याने दुचाकी वाहने स्लीप हाेऊन अपघात हाेतात. परिणामी, या राेडच्या कामाची चाैकशी करून कंत्राटदार व त्याला पाठीशी घालणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी खात, देवमुंढरी, वायगाव यासह परिसरातील गावांमधील नागरिकांनी केली आहे.