काटोल / रामटेक / कामठी / कळमेश्वर / उमरेड / रामटेक / कन्हान / नरखेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण कोरोना साखळी अधिक घट्ट होताना दिसत आहे. आठवडाभरात गावागावांत पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. शनिवारी तेरा तालुक्यात ४१५ रुग्णांची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यात ३५ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न. प. क्षेत्रातील २०, तर ग्रामीण भागात लोणारा, धापेवाडा येथे प्रत्येकी तीन , तेलकामठी, मोहपा, कोहळी येथे प्रत्येकी दोन तर मांडवी, पिपळा आणि गोंडखैरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
काटोल तालुक्यात १६८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील १८, तर ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. शहरात होळी मैदान, पावर हाऊस येथे प्रत्येकी तीन, आयू. डी. पी, पेठ बुधवार, रेल्वेस्टेशन येथे प्रत्येकी दोन, तर धवड ले-आउट, बसस्टॅण्ड परिसर, धंतोली, लक्ष्मीनगर, दोडकीपुरा, पंचवटी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात येनवा येथे दोन, तर कोंढाळी, खामली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कामठी तालुक्यात २६ रुग्णांची भर पडली आहे. यात शहरातील विविध भागांतील १७, तर ग्रामीण भागातील नऊ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात वडोदा येथे तीन, कोराडी, अजनी, खसाळा, खैरी, येरखेडा, रनाळा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात दहा रुग्णांची नोंद झाली. यातील तीन रुग्ण शहरातील ७ ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८६, तर शहरातील ६८ इतकी झाली आहे. शनिवारी भिष्णूर येथे ५, तर सिंजर, थाटूरवाडा येथे एका रुग्णाची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात १२ रुग्णांची आणखी भर पडली आहे. शहरात भगतसिंग वॉर्ड येथे एक तर ग्रामीण भागात हिवरा बेंडे येथे (६), सिंदेवाही (२) तर मनसर, नगरधन व आजनी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. उमरेड तालुक्यात शनिवारी ३ नवीन रुग्णांची नोंद झाली. तीनही रुग्ण उमरेड शहरातील आहेत. तालुक्यात एकूण रुग्णांची संख्या १,३३१ झालेली आहे. यापैकी १,१९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ८९ रुग्णावर उपचार सुरु आहेत.
वराडा येथे धोका वाढला
पारशिवनी तालुक्यातील वराडा गावात शनिवारी २३ रुग्णांची नोंद झाली. येथील रुग्णसंख्या ४९ वर पोहोचली आहे. गावात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची चाचणी करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना होमक्वॉरंटाइन करण्यात आले तर यातील एकाला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अन्सारी यांनी दिली.