मंगेश व्यवहारे, चंदू बोरकर
नागपूर : नागपूर ग्रामीण तालुक्यातील दवलामेटी ग्रामपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रस्थापितांवर मात करून झेंडा फडकविला आहे. भाजपच्या खात्यात ५ ग्रामपंचायती आल्या आहे, तर महाविकास आघाडीने ४ ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. एका ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या पॅनलच्या सदस्यांनी कुण्याच पक्षाचे समर्थन मान्य केले नाही.
तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजनी नागपूर तहसीलमध्ये पार पडली. दवलामेटी, बहादुरा, सोनेगाव निपानी या १७ सदस्यांच्या ग्रामपंचायतीपैकी बहादुरा ग्रामपंचायतीवर भाजपाने, तर सोनेगाव निपानी ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळविला. दवलामेटी ही ग्रामपंचायतीवर गेल्या टर्ममध्ये भाजपाची सत्ता होती. यंदा येथे वंचितचा उदय झाला. भाजपला ५ जागेवर रोखत वंचितने ७, काँग्रेसने ३, बसपाने १ व १ सदस्य अपक्ष निवडून आला. या ग्रामपंचायतीवर वंचितने दावा केला आहे. पेठ कालडोंगरी ग्रामपंचायतच्या काँग्रेस समर्थित पॅनलने लढविलेल्या ८ पैकी ८ ही जागा जिंकल्या. सुराबर्डी ग्रामपंचायतीत भाजपा समर्थित पॅनलने लढविलेल्या ९ पैकी ९ जागा जिंकल्या. डोंगरगाव ग्रामपंचायतीवर भाजप समर्थित पॅनलने ९ पैकी ८ जागेवर विजय मिळविला. महाविकास आघाडीच्या पॅनलला १ जागा मिळाली. कापसी खुर्द ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस समर्थित पॅनलने ८ जागा जिंकत भाजप समर्थित पॅनलला केवळ ३ जागेवर रोखले.
दरम्यान, बोथली ग्रामपंचायतीत भाजप समर्थित ग्रामविकास आघाडी पॅनलने ९ तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या महाविकास आघाडी पॅनलने ६ जागा मिळविल्या. दृगधामना ग्रामपंचायतीच्या ९ जागापैकी काँग्रेस समर्थित पॅनलने ७ व भाजपा समर्थित पॅनलने २ जागा मिळविल्या. धामना लिंगा ग्रामपंचायतीत ११ पैकी भाजपच्या पॅनलले ८ व महाविकास आघाडीने ३ जागा मिळविल्या.
- आम्ही कुणाचेही समर्थन घेतले नाही
पांजरी (बु) ग्रामपंचायतमध्ये ११ जागांसाठी निवडणूक झाली. येथे परिवर्तन विकास पॅनलने ७, ग्राम विकास पॅनलने ३ व १ अपक्ष सदस्य निवडून आले. ७ जागा मिळविलेल्या परिवर्तन विकास पॅनलच्या सदस्यांनी आम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थन घोषित करीत नसल्याचे सांगितले.
- जि.प. सभापती, पं.स. सभापती ने राखली ग्रा.पं.
जि.प.च्या शिक्षण सभापती भारती पाटील यांचे मुळगाव असलेल्या सोनेगाव निपानी या ग्रामपंचायतीत त्यांनी एकहाती विजय मिळविला. ११ महिला सदस्या त्यांनी निवडून आणल्या. त्यांचा १ सदस्य अविरोध निवडून आला, असे १७ पैकी १६ सदस्य त्यांनी निवडून आणले, तर नागपूर पंचायत समिती सभापती रेखा वरठी यांच्या दृगधामना ग्रा.पं.मध्येही त्यांनी ९ पैकी ७ सदस्य काँग्रेसचे निवडून आणले.
- भाजप जि.प. सदस्याची उडाली भंबेरी
भाजपचे जि.प. सदस्य सुभाष गुजरकर यांच्या सर्कलमध्ये असलेली बहादुरा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत भाजप समर्थित दोन पॅनल एकमेकाविरुद्ध लढले. या दोघांनाही सांभाळण्यात जि.प. सदस्याची चांगलीच भंबेरी उडाली होती, पण काँग्रसेला ही ग्रा.पं. कॅश करता आली नाही. भाजपमध्ये गटबाजी असतानाही भाजपने १७ पैकी १५ जागा जिंकल्या.
- मतमोजणीच्या स्थळी कधी जल्लोष कधी नाराजी
सर्वप्रथम बहादूरा ग्रा.पं.च्या मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांतच भाजपच्या गोटात जल्लोष सुरू झाला, पण कापसी खुर्द ग्रा.पं.च्या मतमोजणीनंतर काँग्रेसच्या गोटात जल्लोष वाढला. कधी काँग्रेस, तर कधी भाजपच्या घोषणांनी परिसर दुमदुमत असताना, अचानक झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जल्लोषाने सर्वांच्याच नजरा वळविल्या. काँग्रेसच्या जल्लोषात जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, ज्येष्ठनेते नाना गावंडे, भारती पाटील यांची उपस्थिती होती.