खापरखेडा : नजीकच्या वलनी रेतीघाटात पोकलॅण्डद्वारे रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने महसाूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस या रेतीघाटात पाहणी करण्यासाठी गेले. दरम्यान, रेतीमाफियांनी या कर्मचार्यांशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे, या या घटनेची तक्रार रविवारी सायंकाळी तहसीलदार रवींद्र माने यांच्या समक्ष खापरखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. वलनी रेतीघाटात पोकलॅण्ड मशीनद्वारे रेतीचे उत्खनन केले जात असल्याची माहिती मिळताच मंडळ अधिकारी प्रकाश हारगुडे, तलाठी राजेश बारापात्रे, कोतवाल नीलेश बोबडे, पोलीस शिपाई हेमंत रंगारी आदी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचेवेळी या कर्मचार्यांना रेती घेऊन येत असलेला एमएच-४0/वाय-१५९५ क्रमांकाचा ट्रक दिसला. या कर्मचार्यांना पाहताच ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. कर्मचारी ट्रकचा पंचनामा करीत असताना १२ ते १५ जण हातात शस्त्र घेऊन ट्रकजवळ आले. चार-पाच हस्तकांनी हेमंत रंगारी याच्या हातची काठी हिसकावून त्याला बाजूला नेले व धक्काबुक्की करीत धमकावले. चार-पाच जणांनी राजेश बारापात्रे व नीलेश बोबडे या दोघांना मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी रेतीमाफिया येथे पोहोचला. त्याने हारगुडे यांच्याशी ‘सेटलमेंट’ करण्याचा प्रयत्न केला. माफियांनी हा ट्रक रिकामा करून घेऊन गेले. कर्मचारी थेट खापरखेडा पोलीस ठाण्यात आले. या हस्तांकानी कर्मचार्यांचा पोलीस ठाण्यापर्यंंंत पाठलाग केला. या कर्मचार्यांनी रात्री पाळीवर असलेल्या पोलीस अधिकार्याला हकीकत सांगितली. या कर्मचार्यांना लेखी तक्रार तयार करण्यास सांगून आपण घटनास्थळी जात असल्याचे सांगून निघून गेले. त्याचवेळी दोन रेतीमाफिया पोलीस ठाण्यात आले व त्यांनी हारगुडे यांच्याशी पुन्हा सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कर्मचार्यांनी शनिवारी रात्री तक्रार दाखल केली नाही. तहसीलदार माने हे हारगुडे यांच्यासोबत रविवारी पोलीस ठाण्यात आले व तक्रार दाखल केली. या प्रकरणी खापरखेडा भादंवि ३५३, ३७९, ५११, ५0६, ३४ अन्वये ट्रकचालक, मालक व दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
महसूल अधिकारी, पोलिसांना मारहाण
By admin | Updated: May 13, 2014 01:01 IST