लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : स्थानिक नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एकूण २३ विविध मागण्यांसाठी शहरातील महात्मा गांधी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमाेर बेमुदत धरणे आंदाेलन करायला सुरुवात केली आहे. या आंदाेलनाचा शुक्रवारी (दि. १२) ४७ वा दिवस हाेता. या काळात नगरपरिषद प्रशासनाने आंदाेलनाकडे लक्ष दिले नाही, असा आराेप वयाेवृद्ध आंदाेलकांनी केला आहे.
दर महिन्याला सात तारखेच्या आत पेन्शनची रक्कम बॅंक खात्यात जमा करण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेगातील थकबाकीची रक्कम एकरकमी देण्यात यावी, नगरपालिकेत २२ लाख रुपयांच्या कराची अफरातफर करण्यात आली, या प्रकरणात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, शहरातील कचरा संकलनामध्ये निविदाधारकांची ५० टक्के बचत हाेते, याकडे प्रशासन बघ्याची भूमिका घेत असून, त्याकडे लक्ष द्यावे, पालिका कर्मचारी १२ वर्षांपासून पदाेन्नतीपासून वंचित आहेत, त्यांना तातडीने पदाेन्नती देण्यात यावी. पात्र कर्मचाऱ्यांना पदाेन्नती दिल्यानंतर त्यांना त्यांच्या वेतनाच्या फरकाची रक्कम एकरकमी देण्यात यावी, शहरातील सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे समानतेने वितरण करावे, विशेष स्वच्छता कराची कोणतीही तरतूद नसल्याने हा कर रद्द करण्यात यावा, यासह एकूण २३ विविध मागण्यांसाठी हे आंदाेलन केले जात असल्याची माहिती आंदाेलकांनी दिली.
या काळात नगरपरिषद प्रशासनाने आपल्या मागण्या व आंदाेलनाकडे लक्ष दिले नाही, असा आराेपही आंदाेलकांनी केला आहे. आंदाेलनात अरुण पर्बत, सुरेश धिरडे, दौलतराव बागडे, हरिश्चंद्र राजूरकर, रमेश तळेगावकर, चिंधुजी सुरजुसे, प्रभाकर वड्याळकर, शंकर ढोरे, नामदेव घाटोळे, मोहन सावरकर यांच्यासह अन्य सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
....
पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
आपण मागील ४६ दिवसांपासून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदाेलन करीत आहाेत. प्रशासन आपल्या हक्काची रक्कम देण्यास दिरंगाई करीत असल्याने तसेच आधीच आर्थिक अडचणी असल्याने आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करणे व प्रसंगी औषधाेपचार करणे शक्य हाेत नाही. वेळीच न्याय न मिळाल्याने चार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा औषधाेपचाराविना मृत्यू झाला आहे. या घटनांची पुनरावृत्ती हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही वयाेवृद्ध आंदाेलकांनी सांगितले.