निशांत वानखेडे
नागपूर : बर्फाळ प्रदेश म्हणून ओळख असलेल्या ‘आर्क्टिक’मध्ये बर्फ वितळायला लागले आहे, टुंड्रा प्रदेशात तापमान वाढत असल्याने जंगलांना आगी लागत आहेत, अशा अनेक उदाहरणांसह क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल हाेत असल्याचे आपण ऐकत असताे. मात्र आपल्याला काय हाेणार म्हणून दुर्लक्षित करूनही देताे. या साऱ्या दूरच्या गाेष्टी म्हणून साेडून देत असाल तर आपण माेठ्या संकटाकडे कानाडाेळा करताेय हे लक्षात घ्या. कारण आपल्या अवतीभाेवती घडणाऱ्या गाेष्टी हवामान बदलाचे संकेत देणाऱ्याच आहेत. वाढत असलेले तापमान, बदलेला पावसाचा पॅटर्न हे त्याचेच परिणाम आहेत. वेळीच पावले उचलली गेली नाही तर आपल्या देशातूनही लाखाे लाेक ‘क्लायमेट रेफ्यूजी’ ठरतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या संशाेधकांनीही हवामान बदलाबाबत संशाेधन चालविले आहे. मागील काही वर्षात विदर्भात ऋतुचक्रामध्ये झालेल्या बदलाच्या अभ्यासातून काही संकेत देण्यात आले आहेत. त्यांच्या मते २०३० पर्यंत आणखी गंभीर परिणाम अनुभवायला मिळतील.
हवामान बदलाचा जागतिक प्रभाव
1. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान (एसएसटी) आणि महासागरातील आम्लता वाढल्यामुळे प्रवाळ खडकांचे नुकसान
2. पूर, चक्रीवादळ, उष्णकटिबंधीय वादळे, उष्णतेच्या घटना, जंगलातील आग अशा घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढली.
3. समुद्र पातळी वाढणे आणि किनारी पूर. मालदीव किंवा मॉरिशससारखे देश समुद्र पातळी वाढल्यास त्यांची लोकसंख्या स्थलांतरित करण्यासाठी जमीन खरेदी करत आहेत.
4. बर्फमुक्त आर्क्टिक प्रदेश - जागतिक वातावरणीय तापमानात वाढ झाल्यामुळे, आर्क्टिक प्रदेशातील बर्फाचे आवरण वितळेल, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढेल आणि उच्च अल्बेडो प्रदेश नष्ट होईल ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढेल.
विदर्भात दिसणारे परिणाम
नागपूर विभागामध्ये १९७०-७९ च्या दशकाच्या तुलनेत मान्सून नंतरच्या आणि हिवाळ्याच्या हंगामात पाऊस कमी झाला आहे.
- १९७०-७९ च्या तुलनेत पावसाळ्यात पावसाचे प्रमाण १५ टक्के वाढले आहे.
- पावसाळ्यात पावसाच्या दिवसांची संख्या कमी होत आहे. याचा अर्थ मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण वाढले पण पावसाचे दिवस इतके कमी झाले आहेत की, भविष्यात पावसाचा जोर कमी होऊ शकतो.
- यावरून मान्सूनच नाही तर एकूणच निसर्गचक्राची अनियमितता वाढेल व त्याचा कृषी आणि दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम हाेईल.